खासदार मंडलिकांचा शिवसेनेला जय महाराष्ट्र? कोल्हापूरात सेनेला मोठं भगदाड!

कोल्हापूर : (MP Sanjay Mandlik Region sivsena) मागील काही दिवसाच्या सत्तानाट्यानंतर शिवसेनेचे खासदार संजय मंडलिकांनी मातोश्रीपासून काहीसा दुरावा ठेवल्याची चर्चा रंगली आहे. कार्यकर्त्यांची मतं जाणून घेतल्यानंतर मंडलिक दिल्लीत निर्णय जाहीर करणार असल्यानं आता शिवसेनेत धाकधूक आहे, तर मंडलिक नेमका काय निर्णय घेणार याकडं सर्वांचं लक्ष लागलं आहे.
दरम्यान मंडलिकांनी रविवार दि. १७ रोजी हमीदवाडा (ता. कागल) येथील सदाशिवराव मंडलिक कागल तालुका साखर कारखाना कार्यस्थळावर कार्यकर्त्यांचा जाहीर मेळावा बोलविला आहे. या मेळाव्यात ते आपली भूमिका जाहीर करण्याची शक्यता आहे. शिंदे विरुद्ध ठाकरे गट असा वाद सध्या महाराष्ट्रात सुरू झाला आहे. खासदार संजय मंडलिक हे शिंदे गटासोबत जाण्याच्या तयारीत असल्याची समोर येत आहे. यामुळं कोल्हापुर शिवसेनेला मोठं खिंडार पडण्याची शक्यता आहे.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या बंडखोरीनंतर राज्यातलं राजकीय वातावरण चांगलचं तापलं आहे. शिवसेनेत दोन गट तयार झाले आहेत. त्यात शिंदे गटाचा काहीसा वरचष्मा दिसत आहे. त्यामुळं शिवसेनेचे अनेक निष्ठवंत शिवसेनेला रामराम ठोकताना दिसत आहेत. त्यातच आता खा. मंडलिक यांनी पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंना ‘जय महाराष्ट्र’ करण्याचा निर्णय घेतल्याचं बोललं जात आहे. तर हातकणंगलेचे खासदार धैर्यशील माने यांच्याबाबतीत संशयाचे दाट धुके निर्माण झाले असून, मातोश्रीवरील बैठकीत त्यांनी दोन्ही काँग्रेसची संगत सोडा, अशी भूमिका मांडली होती. त्यामुळं तेदेखील मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटात जाण्याची शक्यता व्यक्त होत आहे.