मुंबई : शिवसेना भवन परिसरात कारला भीषण आग

मुंबई | आज दुपारच्या सुमारास शिवसेना भवन परिसरात कारने पेट घेतल्याने वाहतुकीचा खोळंबा झाला. अवघ्या काही क्षणात हा प्रकार घडला. त्यानंतर पोलिसांनी सेना भवन परिसरातील वाहतूक तातडीनं रोखून धरली आणि स्थानिकांच्या मदतीनं आग विझवण्याचे प्रयत्न सुरू केले. सेना भवनच्या बाजूला असलेल्या कोहिनूर स्क्वेअर इथल्या कर्मचाऱ्यांना आग लागल्याची माहिती मिळताच या कर्मचाऱ्यांनी प्रसंगावधान दाखवत त्यांच्या इमारतीचा अग्निशमन नियंत्रण पंप सुरू केला आणि आग नियंत्रण आणण्याचे प्रयत्न सुरू केले. या कर्मचाऱ्यांच्या प्रयत्नाने ही आग अखेर नियंत्रणात आली.

यावेळी कारमध्ये असणाऱ्या ड्रायव्हरने लक्षात येताच तातडीने प्रवाशांना उतरण्यास सांगितले. ड्रायव्हरच्या प्रसंगावधानाने यात कोणतीही जीवित हानी झालेली नाही. अरमन अहमद असे चालकाचे नाव आहे. त्यांनी दिलेल्या माहितीनुसार सुरुवातीला गाडीतून धूर आला आणि नंतर इंजिन आणि क्लच्या प्लेटला आगल लागली. त्यानं तातडीनं ती आग विझवली. मात्र तो आणखी पाणी आणायला गेला तेव्हा गाडीनं पेट घेतला आणि गाडी जळून खाक झाल्याची माहिती ड्रायव्हरने दिली.

Dnyaneshwar: