शिंदे सरकारला उच्च फटकार; नांदेड मृत्यू प्रकरणाच्या सुमोटो याचिकेदरम्यान खडे बोल सुनावलं
मुंबई : (Mumbai High Court On State Government) ठाण्यातल्या कळवा येथील छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात ३ दिवसांत २७ रुग्णांनी मृत्यू झाल्याची घटना ऑगस्ट महिन्यात घडली. ही घटना ताजी असतानाच नांदेडमधील शंकरराव चव्हाण सरकारी रुग्णालयात 24 तासांत 24 रुग्णांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली होती. या घटनेतील मृतांमध्ये 12 नवजात बालकांचाही समावेश होता. त्यानंतर ही मृतांची संख्या सुमारे ४० वर पोहाेचली.
याच घटनेवरून राज्यात तीव्र संतापाची लाट उसळली आहे. यावरूनच राजकीय आरोप-प्रत्यारोपांसह विरोधकांकडून सरकारवर टीकेची झोड उठवली जात आहे, पण आता नांदेड येथील घटनेवरून राजकीय वातावरण तापले असतानाच आता मुंबई उच्च न्यायालयाने(High Court) शिंदे सरकारला खडे बोल सुनावले आहेत.
नांदेडच्या शंकरराव चव्हाण शासकीय रुग्णालयात(Nanded Hospital) मृत्यूच्या थैमानामुळे एकच खळबळ उडाली आहे. या घटनेला जबाबदार धरत विरोधी पक्षांनी सरकारला कोंडीत पकडण्याचा प्रयत्न केला जात आहे, पण आता या घटनेचं खापर रुग्णालय प्रशासनाने औषधांचा तुटवडा आणि रुग्णालयातील कर्मचाऱ्यांच्या कमतरतेवर फोडले आहे. मात्र, आता या गंभीर घटनेची दखल मुंबई उच्च न्यायालयाने घेतली. उच्च न्यायालयाने स्यू मोटू याचिका दाखल करून घेत सरकारला धारेवर धरत प्रश्नांची सरबत्ती केली आहे.
मुंबई उच्च न्यायालयात नांदेडच्या रुग्णालयातील मृत्यूप्रकरणी दाखल केलेल्या स्यू मोटू याचिकेवर सुनावणी पार पडली. या सुनावणीत सरकारी रुग्णालयातील सेवा सुविधा आणि कर्मचाऱ्यांच्या कमतरेतवर बोट ठेवत न्यायालयाने सरकारची चांगलीच कानउघडणी केली. ही सुनावणी मुख्य न्यायमूर्ती डी. के. उपाध्याय यांच्या पीठासमोर घेण्यात आली.