नात्यामध्येच नराधम!

राष्ट्रसंचार न्यूज नेटवर्क
पुणे : सध्याचे जग, समाज खूप वाईट आहे. आपली मुलं अशा वातावरणात सुरक्षित राहतीलच याची गॅरंटी नाही, असं वक्तव्य पालक अथवा कुटुंबातील सदस्यांकडून वारंवार केलं जात असत. मात्र, आपण साधी कल्पनाही करू शकत नाहीत, असे राक्षसी प्रवृत्तीचे नराधम आजही समाजात वावरत आहेत. अशाच काही नात्यांमध्ये ” नराधम ” दडले असून, त्यांनी केलेल्या काळ्या कृत्यांचा थरारक प्रकार उजेडात आला आहे.
घटना रोखण्यासाठी वचक महत्त्वाचा
स्वतःच्या पाल्यांना बाहेरील दुष्ट कृत्यापासून सुरक्षित ठेवण्याची सर्वस्वी जबाबदारी हे त्या पाल्यांचे वडील अथवा कुटुंब किंवा नातेवाईकांची असते. मात्र, अशा कुटुंबप्रमुख किंवा नात्यातील व्यक्तींकडूनच असे घृणास्पद कृत्य केले जात असतील तर अशा अत्याचार पीडित मुलींनी कुणाकडे सुरक्षिततेची अपेक्षा करावी, असा हृदयाला भिडणारा प्रश्न निर्माण होणे स्वाभाविकच आहे. अशी घटना घडू नये, याकरिता पोलीस न्यायव्यवस्था कार्यरत आहे. परंतु अशा व्यवस्थेचा पीडित मुलींना काय फायदा आहे, हे आजवरच्या घडलेल्या अनेक प्रकारांवरून दिसून येते. त्यामुळे अशा घटना रोखण्यासाठी कुठेतरी समाजाचाच वचक असणे महत्त्वाचे आहे.
अशा घटना घडणे म्हणजे समाजाला मोठा चपराक आहे. राक्षसी वृत्ती मुळातच त्यांच्या रक्तात असते, हे या प्रकारावरून दिसून आले आहे. वडील, आजोबा आणि चुलत्यांकडून हा अत्याचार झालेला आहे. यावरून कुंपणानेच शेत खाल्ले तर दाद न्यावी कुणीकडे, असा हा प्रकार आहे. घरातील सदस्यांनीच अशा अश्लील वर्तनापासून दूर राहिले पाहिजे. शुभांगी मगदुम, पोलीस उपनिरीक्षक विश्रांतवाडी पोलीस स्टेशन
देशाला हादरवून सोडणारे दिल्लीतील श्रद्धा खून प्रकरण ही घटना ताजी असतानाच पुण्यात एका सतरा वर्षीय अल्पवयीन मुलीवर सख्ख्या वडिलांकडून, आजोबा आणि चुलत्याकडून गेल्या सहा वर्षांपासून बलात्कार होत असल्याची घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी नराधम बापाला विश्रांतवाडी पोलिसांनी प्रथम बेड्या ठोकल्या असून, अन्य दोघांविरोधात गुन्हा दाखल केला आहे.
थरारक घटनेच्या सविस्तर वृत्तांत असा, अतिशय हुशार असलेली व सध्या बारावी सायन्समध्ये शिकत असलेली १७ वर्षांची मुलगी कॉलेजमधील एका समुपदेशनाच्या कार्यक्रमात तिचा संयम सुटला अन् तिने समुपदेशकांना आपल्यावर गेल्या सहा वर्षापासून होत असलेल्या अत्याचाराची दर्दनाक कहानी कथन केली. उत्तर प्रदेशातील गावाकडे असताना चुलत्याने दमदाटी करुन तिच्यावर वर्षभर अत्याचार केला. आजोबांनी तिचा वारंवार विनयभंग केला. ही बाब तिने आपल्या वडिलांना चिठ्ठी लिहून कळविली. पुण्यात आल्यावर वडिलांनीच तिच्यावर गेली चार वर्षे अत्याचार केल्याचे समोर आले आहे.
अत्याचार पीडित मुलीचे आई वडील पुण्यात मोलमजुरी करुन राहतात. घरची परिस्थिती चांगली नसल्याने त्यांनी फिर्यादीला उत्तर प्रदेशातील आपल्या मूळ गावी राहायला पाठविले. २०१६ ते २०१८ या काळात ही मुलगी साधारण १२-१३ वर्षाची असताना मूळगावी ३३ वर्षाच्या चुलत्याने तिला दमदाटी करुन जबरदस्तीने एक वर्षभर तिच्याबरोबर वारंवार शारिरीक संबंध केला. ७० वर्षाचे आजोबाही तिचे चुंबन घेण्याचा प्रयत्न करुन तिच्याशी शारिरीक चाळे करीत असत. एप्रिल २०१८ मध्ये ती पुण्यात आईवडिलांकडे आली.
तेव्हा तिने आपल्यावरील या अत्याचाराची माहिती चिठ्ठी लिहून वडिलांना कळविली. त्यानंतर तिचे वडिलच तिची आई बाहेर असताना तिच्यावर अत्याचार करु लागले. ५ नोव्हेबर २०२२ रोजी त्याने तिच्या आईला बाहेर पाठवून तिच्यावर अत्याचार केला. इतकी वर्षे अत्याचार सहन करत आलेल्या या मुलीने कॉलेजमधील एका कार्यक्रमात समुपदेशकापुढे आपबिती सांगताच हा थरारक प्रकार उजेडात आला.