संगीतातील घराणी हा संगीतविश्वाचा कणा

सुप्रसिद्ध तबलावादक नयन घोष यांचे प्रतिपादन
उत्तर प्रदेशात जास्त घराणी विकसित झाली. जयपूर, दिल्ली, बनारस, पाटणा ते अगदी ढाक्कापर्यंत ही घराणी पोहोचली होती. प्रत्येक घराण्यात पिढीनुसार दिग्गज कलाकार होऊन गेले. सततच्या चिंतन-मनन आणि संशोधनामुळे नवीन कल्पना अस्तित्वात आणल्या. सुमारे ५०० ते ७०० वर्षांची दूरदृष्टी ठेवून सूर आणि तालाची तंत्रे विकसित केली गेली.
— पंडित नयन घोष
पुणे : गायन, वादन, नृत्य या सर्व कलाप्रकारांमध्ये दिग्गज घराणी अस्तित्वात आहेत. संगीत क्षेत्रातील ही घराणी म्हणजे भारतीय संगीतविश्वाचा कणा आहेत, असे मत आंतरराष्ट्रीय कीर्तीचे कलाकार, प्रख्यात तबलावादक आणि सतारवादक पंडित नयन घोष यांनी व्यक्त केले.
शास्त्रीय संगीताच्या गायन, वादन आणि नृत्य या तिन्ही कलांमध्ये विविध प्रकारच्या उपक्रमांद्वारे सांगीतिक प्रबोधन करून हिंदुस्तानी संगीताचा प्रचार-प्रसार गेली ४४ वर्षे अविरतपणे करण्याचे कार्य पुण्यातील गानवर्धन संस्थेततर्फे केले जाते. त्याचाच एक भाग म्हणून गेल्या ४० वर्षांपासून आयोजिण्यात येणार्या मुक्त संगीत चर्चासत्राचे उद्घाटन प्रसिद्ध नृत्यगुरू शमाताई भाटे यांच्या हस्ते झाले, त्यावेळी सतार रसाविष्कार या विषयावर कला प्रस्तुती करताना पंडित नयन घोष बोलत होते.
यावेळी व्यासपीठावर ज्येष्ठ नृत्यगुरु डॉ. सुजाता नातू, गानवर्धन संस्थेचे अध्यक्ष दयानंद घोटकर, कार्यवाह रवींद्र दुर्वे आणि विश्वस्त सानिया पाटणकर आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी रुही मासोडकर यांना कथ्थक नवोन्मेष पुरस्कार आणि प्रणव गुरव यांना तबला साथसंगत पुरस्कार प्रदान करण्यात आला. प्रत्येकी रुपये ११ हजार असे डॉ. सुजाता नातू पुरस्कृत या पुरस्काराचे स्वरूप आहे.
यावेळी बोलताना पंडित नयन घोष म्हणाले की, प्रत्येक घराण्याने आपापले तंत्र विकसित केले आहे. संगीतविश्वात घराण्यांचे योगदान मोठे आहे, पूर्वी दळणवळण आणि संवाद माध्यमांच्या अभावामुळे दोन घराण्यांमध्ये योग्य ते अंतर राहायचे. दळणवळण आणि संवाद माध्यमांच्या अभावामुळे एका घराण्याचा दुसर्या घराण्यावर प्रभाव पडत नसे. आता बोटाच्या एका स्पर्शाने बसल्या जागी माहितीचे आदानप्रदान होऊ लागल्याने घराण्यांमध्ये तुलना होऊ लागली आहे. हे केवळ भारतातच घडत नसून रोम, पॅरिस, व्हिएन्ना या चित्रकला, मूर्तीशास्त्र या कलाप्रकारांमधील घराण्यांच्याचबाबतीतदेखील हे होत आहे.
यावेळी पंडित घोष यांना पवन सिधाम यांनी तबल्यावर साथसंगत केली. यावेळी शमाताई भाटे आणि डॉ. सुजाता नातू यांनी मनोगत व्यक्त केले. गानवर्धन संस्थेचे अध्यक्ष दयानंद घोटकर यांनी प्रस्ताविक केले. प्राची घोटकर यांनी सूत्रसंचालन केले.