ज्येष्ठ कवी, लेखक ना.धों. महानोर यांचे पुण्यात निधन
पुणे | N D Mahanor Passed Away – काव्यलेखन करणारे, बोली भाषेला आपल्या साहित्यात स्थान देऊन ते लोकप्रिय करणारे ज्येष्ठ कवी, लेखक ना. धों. महानोर (N D Mahanor) (वय ८०) यांचे आज सकाळी पुण्यात निधन झाले. पुणे येथील रुबी रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या मूळ गावी पळसखेडे येथे त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार होणार आहेत.
गेल्या काही दिवसांपासून ते प्रकृती अस्वास्थ्याने त्रस्त होते. त्यांना किडनीचा त्रास होता. त्यांच्या निधनाने साहित्यविश्वाला धक्का बसला आहे. निसर्गकवी, रानकवी म्हणून त्यांना ओळखले जात असत. ते संत साहित्याचे गाढे अभ्यासक होते.
नामदेव धोंडो महानोर यांचा जन्म १६ सप्टेंबर १९४२ रोजी झाला होता. त्यांचा जन्म औरंगाबाद जिल्हातील पळसखेडे ह्या गावी झाला होता. त्यांचे शिक्षण पळसखेडे, पिंपळगाव, शेंदुर्णी, जळगाव येथे झाले होते. त्यानंतर त्यांनी आपल्या जन्मगावी शेतीचा व्यवसाय केला. तसेच साहित्य लेखनही विपुल केले. ते विधान परिषदेवर नियुक्ती आमदार देखील होते.
महानोरांचा पहिला काव्यसंग्रह, रानातल्या कविता (१९६७). त्यानंतर वही (१९७०) आणि पावसाळी कविता (१९८२) असे आणखी दोन काव्यसंग्रह प्रसिद्ध झाले. गांधारी (कादंबरी−१९७२), गपसप (१९७२), गावातल्या गोष्टी (१९८१−दोन्ही लोककथासंग्रह) असे गद्यलेखनही त्यांनी केले आहे. त्यांनी केलेले लोकगीतांचे एक संकलनही (पळसरोडची गाणी, १९८२) प्रसिद्ध झालेले आहे.
रानातल्या कविता, पही, गांधारी ह्या त्यांच्या पुस्तकांत महाराष्ट शासनाने पारितोषिके-पुरस्कार देऊन गौरविले आहे. मराठीतील महत्त्वपूर्ण काव्यलेखनासाठी देण्यात येणारे गदिमा पारितेषिकही त्यांना मिळाले (१९८१-८२). महाराष्ट्रातील साहित्यिक−कलावंतांने प्रतिनिधी म्हणून १९७८ मध्ये महाराष्ट्र विधान परिषदेवर महाराष्ट्र शासनाने त्यांची नियुक्ती केली होती.
महानोरांनी गद्यलेखन केलेले असले, तरी रसरशीत निसर्गभान जागविणारे कवी म्हणूनच मुख्यतः ते प्रसिद्ध आहेत. जिला अस्सल, संपन्न आणि तरल अशी ग्रामीण संवेदनशीलता म्हणता येईल, तिचा अपूर्व असा प्रत्यय त्यांच्या कवितेतून येतो. म्हणूनच पूर्वकालीन वा समकालीन कवींना प्रभावापासून ही कविता मुक्त आहे. तसेच लोकगीतांतील छंद-लय, जिवंत उत्स्फुर्तता, आपल्या मातीशी आणि बोलीभाषेच्या सहजतेशी नाते सांगणारी जिवंत शब्दकळा ही महानोरांच्या कवितेची लक्षणीय वैशिष्ट्ये त्यांच्या ह्या खास संवेदनशीलतेतून स्वाभाविकपणेच आलेली आहेत. अनुभवागणिक नवी रूपे घेणाऱ्या त्यांच्या भाववृत्तींशी सूर जमविणारी चित्रमयताही त्यांच्या कवितेत आढळते. काही चित्रपटांसाठीही त्यांनी गीते लिहिली आहेत.