जिल्ह्यातील शाळांना आता नॅकचे निकष

शिक्षण विभाग : प्रायोगिक तत्त्वावर उपक्रम
पुणे : राज्यातील शाळांचा दर्जा आणि शैक्षणिक गुणवत्ता सुधारण्यासाठी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद यांच्या अध्यक्षतेखाली सरकारने समिती स्थापन केली होती. या समितीने नुकताच शाळांच्या मूल्यांकनाचा अहवाल शासनाला सादर केला आहे. या अहवालातील मूल्यांकनाचे निकष पुणे जिल्ह्यातील शाळांसाठी प्रायोगिक तत्त्वावर राबविण्यात येणार आहेत. समितीने आराखड्याचा अहवाल, तसेच राज्यात आदर्श शाळांच्या मूल्यांकनासाठी कोणते निकष असावेत, याबाबत अभ्यास करून अहवाल तयार केला आहे. तो नुकताच राज्याच्या शिक्षण सचिवांना सादर करण्यात आला आहे.
पुणे जिल्ह्यातील सुमारे सात हजार खासगी अनुदानित, विनाअनुदानित तसेच सरकारी शाळांचे मूल्यांकन होणार आहे. जिल्हा परिषदांच्या शाळांचाही यात समावेश असणार आहे. पुणे जिल्ह्यातील पहिली ते बारावीपर्यंतच्या शाळांचे मूल्यांकन या शैक्षणिक वर्षापासून करण्यात येणार आहे.
— आयुष प्रसाद ,मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद
शाळांचे आता नॅकच्या धर्तीवर मूल्यांकन करण्याचा राज्य सरकार विचार आहे. मूल्यांकनासाठी कोणत्या निकषांची अंमलबजावणी शाळांनी करावी, याचीही शिफारस करण्यात आली आहे. राज्याच्या ‘माझी समृद्ध शाळा’, ‘शाळा ग्रेडेशन’ या उपक्रमांसह राष्ट्रीय स्तरावरील ‘शाळासिद्धी’, ‘स्वच्छ शाळा, सुंदर शाळा’ तसेच गुजरात राज्याचा ‘गुणोत्सव’, ओडिशाचा ‘समीक’ व कर्नाटक राज्याने विकसित केलेला गुणवत्ता व प्रमाणीकरण आराखडा, या सर्व प्रचलित शाळा मूल्यांकनाच्या बलस्थानांचा अभ्यास समितीने केला आहे. त्या सर्वांचा समावेश करून पुणे जिल्ह्यात राबविण्यात येत असलेल्या शाळा सुधार कार्यक्रमांतर्गत मूल्यांकनाचा प्रायोगिक प्रकल्प राबविला जाणार आहे.