काळं फासल्यानंतर नामदेवराव जाधव यांचा शरद पवारांसह रोहित पवारांवर निशाणा; म्हणाले…
पुणे | राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटाच्या कार्यकर्त्यांनी प्रसिद्ध वक्ते नामदेव जाधव यांच्या तोंडाला काळे फासल्याची घटना पुण्यात घडली. माध्यमांशी बोलत असतानाच पवार समर्थकांनी अचानक नामदेव जाधव यांच्या तोंडाला काळे फासले. या प्रकरणानंतर जाधव यांनी फेसबुक लाइव्ह करत पुन्हा एकदा शरद पवार आणि रोहित पवार यांच्यावर निशाणा साधला आहे.
नामदेवराव जाधव यांचा शरद पवारांवर निशाणा
नामदेवराव जाधव यांनी फेसबुक लाइव्ह करत त्यांच्यावर झालेल्या हल्ल्याबद्दल प्रतिक्रिया दिली. पुण्यामध्ये आज आम्ही शिवजयंती अॅट सिंगापूर या कार्यक्रमाची माहिती देण्यासाठी आलो होतो. या संदर्भातील कार्यक्रम या लोकांनी उधळून लावला, त्याच्यानंतर पत्रकारांशी बोलताना हा हल्ला करण्यात आला. शिव फुले शाहू आंबेडकरांचं नाव घेणाऱ्यांनी हा हल्ला केला. शिवाजी महाराजांचे विचार जगभर जाऊ नयेत म्हणून हा हल्ला करण्यात आला आहे, असं नामदेवराव जाधव म्हणाले. हा एक प्रकारे लोकशाहीवरचा हल्ला आहे, असं नामदेवराव जाधव म्हणाले.
हा हल्ला लोकशाहीवरचा आहे, संबंधित लोकांवर गुन्हा दाखल करण्याची मागणी करतो. कायदा व सुव्यवस्थेला चॅलेंज करण्याचा प्रयत्न आहे. हा पाच कोटी मराठ्यांवरचा हल्ला आहे, असं नामदेवराव जाधव म्हणाले. मी पोलीस आयुक्त कार्यालयात जाणार आहे. कायदेशीर कारवाई करणार असून कार्यकर्त्यांना जबाबदार धरणार नसून पहिलं नाव शरद पवार आणि दुसरं नाव रोहित पवार यांचं असेल. या दोघांची खासदारकी आणि आमदारकी घालवण्यासाठी प्रचंड मोठं पाऊल उचलणार असल्याचं नामदेवराव जाधव म्हणाले.