मुंबई | काँग्रेसमधील अंतर्गत वाद आता चव्हाट्यावर आला आहे. काँग्रेसचे नेते बाळासाहेब थोरात यांनी विधिमंडळ पक्षनेते पदाचा राजीनामा दिलाय. काही दिवसांपूर्वी बाळासाहेब थोरात यांनी प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्याविरोधात जाहीर नाराजी व्यक्त केली होती. आता बाळासाहेब थोरात यांच्या विधीमंडळ नेतेपदाचा राजीनामा दिल्याची माहिती समोर आली आहे. प्रभारी एच के पाटील आणि अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांना दिलेल्या पत्रात राजीनामा दिल्याचा उल्लेख केला आहे.
या चर्चांवर नाना पटोले यांनी प्रतिक्रिया दिली. बाळासाहेब थोरात यांचा वाढदिवस आहे, त्यांना वाढिवसाच्या शुभेच्छा देत असून राजकीय उत्कर्ष व्हावा, त्यांनी राजीनामा दिलेला नाही. आम्ही आज कार्यकारिणीची बैठक बोलावली आहे. विधान परिषद निवडणुकीत यश मिळवलेल्या आमदारांचा सत्कार आयोजित केला आहे. 15 तारखेला बैठक ठेवली आहे, असं नाना पटोले म्हणाले.
बाळासाहेब थोरात आमच्या संपर्कात नाहीत
आमच्या काँग्रेसमध्ये काय झालं, याची चर्चा जास्त होते. पण भाजपमध्ये काय चाललं आहे, याबद्दल कुणी काही बोलत नाही. आम्ही लोकशाहीला मानणारे लोक आहोत. पण जी लोक लोकशाहीला मानत नाही, त्यांच्याबद्दल विचारा. बाळासाहेब थोरात हे आमच्याशी काही बोलतच नाही. ते आमच्या संपर्कात नाही, असंही नाना पटोले म्हणाले.
माझा त्यांच्याशी संपर्क होत नाही. मला कोणतीही गोष्ट माहिती नाही. पुण्यात सुद्धा ते आले नव्हते. दिल्ली कोण काय तक्रारी करत आहे, हे राजकारण आहे. मला त्याबद्दल काही माहिती नाही. आमच्याकडे लोकशाही आहे. काही लोकांना आयते बसून पदं हवी आहे. असंही नाना पटोले म्हणाले.