ताज्या बातम्यारणधुमाळी

“शिंदे-फडणवीस यांनी तानाजी सावंतांची मंत्रिमंडळातून हकालपट्टी करावी”, काँग्रेस नेत्याची मागणी

मुंबई | Nana Patole On Tanaji Sawant – राज्याचे आरोग्य मंत्री तानाजी सावंत (Tanaji Sawant) यांनी मराठा आरक्षणावर (Maratha Reservation) वादग्रस्त वक्तव्य केलं आहे. काल (25 सप्टेंबर) उस्मानाबादमध्ये हिंदूगर्वगर्जना संवाद यात्रेदरम्यान आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात सावंत यांची मराठा आरक्षणासंदर्भात भाष्य करताना जीभ घसरली होती. मराठा आरक्षण गेल्यानंतर दोन वर्ष तुम्ही गप्प होता आणि आता सत्तांतर झाल्यानंतर तुम्हाला आरक्षणाची खाज सुटली. मात्र, आता पुढील दोन वर्षांमध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) हे टिकाऊ आरक्षण मिळवून देतील, असं वादग्रस्त वक्तव्य तानाजी सावंत यांनी केलं आहे. यासंदर्भात महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ते मुंबईत बोलत होते.

“मराठा आरक्षणाची मागणी मागील अनेक वर्षांपासून होत आहे. मराठा समाजाला आरक्षण मिळावं यासाठी राज्यातून विविध संघटना, राजकीय पक्ष यांचे प्रयत्न सुरु आहेत. सरकारी पातळीवर व न्यायालयीन पातळीवरही हा लढा सुरु आहे. महाविकास आघाडी सरकारने मराठा समाजाला आरक्षण मिळावं यासाठी प्रयत्न केले,” असं नाना पटोले म्हणाले.

“2014 साली काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आघाडी सरकारने मराठी समाजाला आरक्षण दिले होते. परंतु त्यानंतर आलेल्या फडणवीस सरकारच्या निष्क्रियतेमुळे मराठा आरक्षण संपुष्टात आलं. आजही हा प्रश्न सुटावा व मराठा समाजाला आरक्षणाचा लाभ मिळावा यासाठी प्रयत्न सुरु असताना राज्यातील एक मंत्री अशा प्रकारचे बेताल वक्तव्य करतो हे अत्यंत निषेधार्ह आहे,” असं म्हणत नाना पटोलेंनी तानाजी सावंतांवर टीका केली आहे.

पुढे ते म्हणाले, तानाजी सावंत यांचं विधान सत्तेचा माज दाखवते पण महाराष्ट्राची जनता सुज्ञ आहे, सत्तेची मस्ती कशी उतरवायची हे त्यांना चांगलं माहित आहे. आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांनी मराठा समाजाची जाहीर माफी मागावी व शिंदे-फडणवीस यांनी त्यांची मंत्रिमंडळातून हकालपट्टी करावी,” अशी मागणी नाना पटोले यांनी केली आहे.

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये