‘मविआ’वर बोलताना नाना पटोलेंचे मोठे विधान, म्हणाले; “शिवसेना आमचा नैसर्गिक…”
मुंबई : (Nana Patole On Uddhav Thackeray) शिवसेना -राष्ट्रवादी-काँग्रेस हे पक्ष अजूनही महाविकास आघाडीच्या रुपात एकत्र आहेत. मात्र, आगमी महापालिका, विधानसभा तसेच लोकसभा निवडणुकीमध्ये हे तिन्ही पक्ष एकत्र राहणार का याबाबत संभ्रम आहे. असे असतानाच आता काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी मोठे विधान केले आहे. शिवसेना आमचा नैसर्गिक मित्र नाही. ज्यांना आमचा विचार मान्य आहे, ते आमचे मित्र आहेत. शिवसेना आणि भाजपा मुंबई क्रिकेट असोशिएशनच्या निवडणुकीत एकत्र होते. याच कारणामुळे आम्हाला शिवसेनेच्या भूमिकेबाबत संभ्रम आहे, असे नाना पटोले म्हणाले.
“भाजपा आणि शिवसेनेचे झालेले भांडण आणि पहाटे स्थापन झालेलं सरकार या सर्व घटनाक्रमाची आपल्याला कल्पना आहे. म्हणूनच शिवसेना आमचा नैसर्गिक मित्र नाही. ते आमच्या विचारासोबत असतील तर ते आमचे मित्र आहेत. काही दिवसांपूर्वी मुंबई क्रिकेट असोशिएशनची निवडणूक झाली. या निवडणुकीत शिवसेना, भाजपा आणि राष्ट्रवादी सगळे सोबत होते. त्यामुळे अजूनही आम्हाला संभ्रम आहे,” असे नाना पटोले म्हणाले.
दरम्यान, अंधेरी पूर्व विधानसभा पोटनिवडणुकीत हे तिन्ही पक्ष एकत्र आले. तिन्ही पक्षाच्या नेत्यांनी एकत्र पत्रकार परिषद घेऊन तशी घोषणा केली होती. मात्र नाना पटोले यांनी महाविकास आघाडीच्या भवितव्याबाबत केलेल्या वरील विधानानंतर आगामी काळात उद्धव ठाकरे, राष्ट्रवादी आणि काँग्रेस हे तिन्ही पक्ष एकत्र निवडणुका लढवणार का? असा प्रश्न उपस्थित होतोय.