शिवसेना खासदार हेमंत पाटलांवर अॅट्रोसिटीचा गुन्हा दाखल; कॉलेजच्या डीन यांना शौचालय साफ करण्यास सांगणे अंगलट
नांदेड | नांदेडच्या शासकीय रुग्णालयातील रुग्णांच्या मृत्यूनंतर (Nanded Hospital Death Case) शिवसेना शिंदे गटाचे खासदार हेमंत पाटील (Hemant Patil) यांनी रुग्णालयाला भेट दिली. यावेळी रुग्णालयातील अस्वच्छता पाहून संतापलेल्या हेमंत पाटलांनी थेट रुग्णालयाच्या डीनलाच स्वच्छतागृह साफ करायला लावले. हे प्रकरण हेमंत पाटलांना भोवले असून त्यांच्याविरोधात ॲट्रॉसिटी व सरकारी कामात अडथळा आणल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकारानंतर विरोधकांनी टीका करत थेट राजीनाम्याची मागणी करण्यात आली होती. त्यानंतर स्वतः डीन डॉ. एस. आर. वाकोडे यांनी तक्रार दाखल केली. अखेर खासदार हेमंत पाटलांवर नांदेडच्या (Nanded) ग्रामीण पोलीस ठाण्यात रात्री उशीरा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
नेमकं प्रकरण काय ?
नांदेडच्या शासकीय रुग्णालयातील मृत्यू प्रकरणी विविध नेते, मंत्री रूग्णालयाला भेट देत आहेत. काल खासदार हेमंत पाटील देखील रूग्णालयात आले होते. यावेळी डीन वाकोडे त्यांच्यासोबत होते. एका शौचालयाजवळ दोघेही पोहोचले, तेव्हा त्यात घाण होती. हे पाहून पाटील संतापले व त्यांनी वाकोडे यांच्या हातात झाडू देऊन ती साफ करण्यास भाग पाडले. या प्रकरणी नांदेड ग्रामीण पोलीस ठाण्यात रात्री उशीरा हेमंत पाटील आणि अन्य 10 ते 15 जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.