मराठा आरक्षणासाठी आणखी एका तरुणाची आत्महत्या; नांदेडच्या तरूणानं विष पिऊन संपवलं जीवन
नांदेड | मराठा आरक्षणासाठी (Maratha Reservation) सुरु असलेल्या आत्महत्या काही थांबायला तयार नाहीत. नांदेडमध्ये आणखी एका तरुणाने आरक्षण मिळत नसल्याने आपले जीवन संपवले आहे. नांदेडपासून जवळच असलेल्या मरळक येथे ही घटना घडली.(Nanded News)
मिळालेल्या माहितीनुसार, दाजीबा रामदास कदम असे विष पिऊन जीवन संपवणाऱ्या तरुणाचे नाव आहे. शनिवारी रात्री विष प्राशन केले. त्याला नांदेडच्या शासकीय रुग्णालयात भरती करण्यात आले होते. मात्र, उपचारा दरम्यान त्याचा मृत्यू झाला. दाजीबाकडे सुसाईड नोट सापडली असून त्यात मराठा समाजाला आरक्षण मिळत नसल्यामुळे आत्महत्या करत असल्याचे लिहिले आहे. पोलिसांनी सुसाईड नोट जप्त केली असून दाजीबाचा मृतदेह पोस्टमार्टमसाठी पाठवण्यात आला आहे.
दाजीबा याने मराठा आरक्षण आंदोलनात सहभाग घेतला होता. तो स्पर्धा परीक्षेची तयारी करत होता. मात्र, आरक्षण नसल्यामुळे त्याला यश मिळत नसल्याने तो नैराश्यात होता. त्याच्यासाठी त्याच्या वडिलांनी त्यांची दीड एकर शेती विकली. मात्र, आरक्षण मिळत नसल्याने त्याने आत्महत्या केली. दरम्यान, तहसीलदार विजय आवधान यांनी त्याच्या कुटुंबीयांना मदत करण्याचे आरक्षण दिले आहे.