“अजित पवार माझ्या नादाला लागू नका, नाहीतर पुण्यात येऊन…”, नारायण राणेंचा थेट इशारा

कोल्हापूर | Narayan Rane On Ajit Pawar – खासदार संजय राऊत यांनी आपल्या ट्विटर हँडलवरून रीट्विट केलेला एक व्हिडिओ चांगलाच चर्चेत आला आहे. हा व्हिडीओ विरोधी पक्षनेते अजित पवार (Ajit Pawar) यांच्या भाषणातला असून त्यामध्ये अजित पवार नारायण राणे (Narayan Rane) यांच्यावर मिश्किल भाषेत टिप्पणी करताना दिसत आहेत. अजित दादांनी नारायण राणेंच्या वांद्र्यातील पराभवाचा संदर्भ देत त्यांचा पराभव एका महिलेनं केल्याचं विधान केलं आहे. “नारायण राणेंनीच शिवसेना (Shivsena) फोडली. सगळे पडले, राणे साहेब तर दोनदा पडले. एकदा कोकणात आणि एकदा मुंबईतील वांद्र्यात पडले. तिथे तर त्यांना महिलेनं पाडलं. बाईनं पाडलं बाईनं”, असं अजित पवार या व्हिडीओमध्ये म्हणताना दिसत आहेत. यावर आता केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी खोचक शब्दांत प्रत्युत्तर दिलं आहे.
अजित पवार पुण्यात येऊन बारा वाजवीन, माझ्या नादाला लागू नका, अशा शब्दात नारायण राणेंनी अजित पवारांना इशारा दिला आहे. सध्या नारायण राणे कोल्हापूर दौऱ्यावर आहेत. यावेळी त्यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना अजित पवारांनी केलेल्या टीकेचा समाचार घेतला.
बारामतीच्या बाहेर जाऊन बारसं घालायचं बंद करा. अजित पवारांना बारामतीच्या बाहेर कितपत राजकारण कळतं हे मला माहीत नाही. सलग सहावेळा मी निवडून आलो आहे. मग महिला असेल किंवा पुरुष असेल उमेदवार हा उमेदवार असतो, असं नारायण राणे म्हणाले.
पुढे त्यांनी उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्यावरही टीकास्त्र सोडलं. उद्धव ठाकरेंकडे काय राहिलं आहे? कुठलंही अस्तित्व नाही, काहीही नाही. गेलेले लोक आपल्याबद्दल काय म्हणतात ते पहा. आपण अडीच वर्षात काय केलं ते पहा म्हणावं, अशी टीका नारायण राणेंनी केली.