पंतप्रधान मोदींचे दिवाळी गिफ्ट! 80 कोटी नागरिकांना 5 वर्षे मोफत शिधा
नवी दिल्ली – (Narendra Modi Dipawali Gift)पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशातील नागरिकांना शनिवारी दिवाळी गिफ्ट दिले. पंतप्रधान मोदी यांनी केंद्र सरकारच्या प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजनेचा कालावधी पाच वर्ष वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे गरीब कुटुंबियांना पुढील पाच वर्ष मोफत शिधा दिला जाणार आहे. माहितीनुसार, ८० कोटी नागरिकांना या योजनेचा लाभ होत आहे.
प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजनेंतर्गत गरीब कुटुंबाना मोफत शिधा दिला जातो. कोरोना महामारीच्या काळामध्ये या योजनेचा शुभारंभ करण्यात आला होता. कोरोना काळामध्ये आर्थिक व्यवहार ठप्प झाले होते. देशात लॉकडाऊन लादण्यात आला होता. अशावेळी गरिबांना दिलासा म्हणून त्यांना मोफत शिधा देण्याचा निर्णय घेण्यात आला होता. दाव्यानुसार, या योजनेचा लाभ ८० कोटी नागरिकांना होत आहे.
प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजनेचा कालावधी डिसेंबरमध्ये संपणार होता. पण, निवडणुकीच्या तोंडावर कालावधी वाढवण्याचा निर्णय घेऊन राजकीय लाभ घेण्याचा प्रयत्न झाल्याची चर्चा आहे. या योजनेंतर्गत गरिबांना पाच किलो गहू किंवा तांदूळ मोफत मिळते. केंद्र सरकारने ही योजना ३० जून २०२० मध्ये सुरु केली होती. कालावधी वाढवल्यामुळे आता या योजनेचा डिसेंबर २०२८ पर्यंत लाभ घेता येईल.