राज्यानंतर केंद्र सरकारचीही नाशिक दुर्घटनेतील मृतांच्या कुटुंबियांना आर्थिक मदत!

नवी दिल्ली | Nashik Bus Accident – नाशिक येथे आज (8 ऑक्टोबर) पहाटे डंपर आणि खासगी बसचा मोठा अपघात झाला आहे. डंपर-खासगी बसच्या अपघातानंतर बसला आग (Bus Fire) लागल्यानं यामध्ये 11 जणांचा मृत्यू झाला आहे. यात लहान मुलासह आईचाही समावेश आहे. तसंच मृतांची संख्या वाढण्याची शक्यता आहे. अपघातग्रस्त बस क्रेनच्या सहाय्यानं घटनास्थळावरून हलविण्यात आली. यावेळी लहान बाळासह दोन मृतदेह आढळल्यानं मृतांचा आकडा 11 वर गेला आहे. दरम्यान, या दुर्घटनेनंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी मृतांच्या नातेवाईकांना मदत जाहीर केली आहे.
नाशिक येथे झालेल्या बस दुर्घटनेनंतर पंतप्रधान मोदींनी दु:ख व्यक्त केलं आहे. याबाबतचं ट्विट करताना पंतप्रधान मोदी म्हणाले, नाशिक इथल्या दुर्घटनेबद्दल ऐकून दु:ख झालं. या दुर्घटनेत ज्यांनी आपल्या प्रियजनांना गमावलं आहे, त्यांच्यासोबत माझ्या संवेदना आहेत. जखमी लोक लवकरात लवकर बरे होवोत. स्थानिक प्रशासन दुर्घटना बाधितांना सर्वतोपरी मदत करत आहे. तसंच या दुर्घटनेत मृत्यूमुखी पडलेल्यांना पंतप्रधान सहाय्यता निधीतून प्रत्येकी 2 लाखांची मदत दिली जाणार असून जखमींना प्रत्येकी 50 हजारांची मदत जाहीर करण्यात आली आहे.
दरम्यान, या घटनेसंदर्भात मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी शोक व्यक्त केला आहे. या घटनेबाबत जिल्हाधिकाऱ्यांसह आयुक्तांशी माझं बोलणं झालेलं आहे. या घटनेत 11 जणांच मृत्यू तर 38 जण जखमी झाल्याची माहिती एकनाथ शिंदे यांनी दिली. जखमींवर तातडीनं उपचार करण्याच्या सूचना मी दिल्या आहेत. कोणत्याही परिस्थितीत जखमींवर चांंगले उपचार झाले पाहिजेत. उपचारात काही कमी पडू नये अशा सूचना दिल्याचं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं.