पुणे : भारतातील सर्वांत मोठ्या मशीन टूल प्रदर्शनात एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटीच्या संशोधक प्राध्यापक संघाने राष्ट्रीय पातळीवर यश संपादन केले आहे.
इंडियन मशीन टूल मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशन इंडियातर्फे आयोजित इमटेक्स फॉर्मिंग २०२२ आणि टूलटेक २०२२ ही प्रदर्शनी बंगळुरू येथे संपन्न झाली. यामध्ये एमआयटी डब्ल्यूपीयूचे संशोधक प्राध्यापक टीममधील यंत्र अभियांत्रिकी संकुल प्रमुख प्रा.डॉ. गणेश काकांडीकर यांच्या नेतृत्वाखालील सहायक प्रा.डॉ. अनिल माशाळकर आणि सहायक प्रा.ओंकार कुलकर्णी यांच्या संघाने मायक्रो फॉर्मिंग या क्षेत्रातील संशोधनासाठी हा गौरव प्राप्त केला आहे.
यावेळी इंडियन मशीन टूल मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशन इंडियाचे अध्यक्ष रवि राघवन आणि उपाध्यक्ष राजेंद्र राजमाने यांच्या हस्ते प्रमाणपत्र देऊन संघाचा गौरव केला. या यशाबद्दल विद्यापीठाचे संस्थापक अध्यक्ष डॉ. विश्वनाथ दा. कराड आणि कार्याध्यक्ष राहुल विश्वनाथ कराड यांनी सर्वांचे अभिनंदन केले.एरोस्पेस क्षेत्रासाठी वापरातील टायटॅनियम या धातूच्या शंभर मायक्रॉनपेक्षा कमी जाडीच्या पत्र्याच्या फॉर्मबिलिटी अॅनॉलिसिस करण्यात आला. विद्यापीठातील एरोस्पेस रिसर्च अँड डेव्हलपमेंट बोर्ड डीआरडीओ प्रायोजित मायक्रोफॉर्मिंग रिसर्च सेंटर येथे हे संशोधन करण्यात आले आहे.
भारतातील सहभागी संघातून त्रिस्तरीय मूल्यमापनातून सर्वोत्तम पाच संघांची निवड करण्यात आली होती. त्यात महाराष्ट्रातील एकमेव संघाचा समावेश आहे. संघाचे अभिनंदन माईर्सचे संस्थापक, सह व्यवस्थापकीय विश्वस्त प्रा. प्रकाश जोशी, कुलगुरू डॉ. आर. एम. चिटणीस, तंत्रशास्त्र विद्याशाखेचे अधिष्ठाता प्रसाद खांडेकर यांनी केले.