राणा-कडू वादाचा नवा अंक सुरु? नवनीत राणा म्हणाल्या, “खासदार म्हणून एवढंच सांगेन…”
अमरावती : (Navneet Rana On Bacchu Kadu) मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मध्यस्थीने रवी राणा-बच्चू कडू वाद संपुष्टात येत असतानाच काल रवी राणा यांनी बच्चू कडूंना घरात घुसून मारण्याची धमकी दिल्याने, वादाचा नवा अंक पहायला मिळणार का? अशा चर्चा सुरु झाल्या आहेत. दरम्यान, या वादावर अमरावतीच्या खासदार नवनीत राणा यांनी प्रतिक्रिया दिली आहे. दोघांनी आता मदभेद दूर करून जनतेच्या प्रश्नांकडे लक्ष द्यायला हवं, अशी विनंती त्यांनी दोन्ही आमदारांना केली आहे.
“आमदार बच्चू कडू आणि रवी राणा यांच्यात गेल्या काही दिवसांपासून जे मदभेद आहेत, ते सर्व जनता बघते आहे. त्यामुळे खासदार म्हणून मी दोघांनाही विनंती करते की, दोघांनी आता मदभेद दूर करून जनतेच्या प्रश्नांकडे लक्ष द्यायला हवं. गेल्या अडीच वर्षात आपल्या अमरावतीचे नुकसान झाले आहे. आज अनेक प्रश्न प्रलंबित आहेत. मात्र, आता एक सक्षम सरकार आपल्याकडे आहे. त्यामुळे आता आपण जनेच्या प्रश्नांकडे लक्ष द्यायला हवं”, अशी प्रतिक्रिया खासदार नवनीत राणा यांनी दिली आहे.
गेल्या ऑगस्ट महिन्यात अचलपूर मतदार संघातील एका दहीहंडी उत्सवाच्या कार्यक्रमात रवी राणांनी बच्चू कडू यांना डिवचलं होतं. ‘मी काही गुवाहाटीला जाणारा आमदार नाही. ना बाप बडा ना भैय्या, सबसे बडा रुपय्या… हे या मतदार संघातल्या आमदाराचे ‘स्लोगन’ आहे,’ अशी टीका त्यांनी केली होती. त्यानंतर बच्चू कडू आणि रवी राणा यांच्यात वाद सुरू झाला. रवी राणांच्या आरोपानंतर बच्चू कडू यांनी त्यांना प्रत्युत्तर देत, ‘येत्या १ नोव्हेंबरपर्यंत पुरावे द्या, अन्यथा परिणामांची तयारी ठेवा’ असं आव्हानच दिले होते.