ताज्या बातम्यामनोरंजनमहाराष्ट्र

‘पठाण’मधील बिकिनी वादावर नवनीत राणांचं भाष्य; म्हणाल्या, “चित्रपटाला बाॅयकाॅट करण्यापेक्षा…”

मुंबई | Navneet Rana – यावर्षी बॉक्स ऑफिसवर आपली हुकूमत असणारे बॉलिवूड चित्रपट चांगलेच आपटले आहेत. मोठे सुपरस्टार असलेल्या चित्रपटांकडे लोकांनी पाठ फिरवली आहे. अशातच ‘बॉयकॉट बॉलिवूड’ हा हॅशटॅग प्रचंड व्हायरल झाला आहे. तसंच आता बाॅलिवूडचा किंग खान शाहरुख खानचा आगामी ‘पठाण’ चित्रपट अडचणीत येण्याची शक्यता वर्तवली जात आहे. सध्या शाहरुख खानच्या (Shahrukh Khan) ‘पठाण’ (Pathaan) चित्रपटातील एका गाण्यामुळे हा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात सापडलेला आहे.

नुकतंच ‘पठाण’ चित्रपटातील एक गाणं प्रदर्शित झालं आहे. या गाण्यावरून सध्या अनेकांनी संताप व्यक्त केला आहे. हे गाणं शाहरूख खान आणि दीपिकावर चित्रित झालं आहे. तसंच या गाण्यात दीपिका बोल्ड अंदाजात दिसत आहे. मात्र, दीपिकानं या गाण्यात केशरी रंगाची बिकनी परिधान केली आहे आणि गाण्याचे शब्द आहेत ‘बेशरम रंग’. यामुळे हिंदू महासभेनं यावर आक्षेप घेतला आहे. तसंच याविरोधात काही ठिकाणी आंदोलनही करण्यात आलं आहे. यावर विविध प्रतिक्रिया उमटत असल्याचं पाहायला मिळत आहे. याप्रकरणावर आता खासदार नवनीत राणा (Navneet Rana) यांनी भाष्य केलं आहे.

नवनीत राणा यांनी एएनआय या वृत्तसंस्थेला मुलाखत दिली. यावेळी त्यांनी ‘पठाण’मधील बिकिनी वादावर प्रतिक्रिया दिली. “जर कुठेही असं काही आक्षेपार्ह आणि भावना दुखावणारे दृश्य असेल तर त्याला एडिट करुन पुन्हा प्रदर्शित करायला हवं”, असं नवनीत राणा म्हणाल्या.

“मला असं वाटतंय की चित्रपटात ज्या रंगाचा गैरवापर केला गेला असेल आणि त्यामुळे जर आपल्या देशातील लोकांच्या भावना दुखावल्या गेल्या असतील तर सर्वप्रथम हा चित्रपट सेन्सॉर बोर्डानं पाहायला हवा. जर कुठेही असं काही आक्षेपार्ह आणि भावना दुखावणारं दृश्य असेल तर त्याला एडिट करुन पुन्हा प्रदर्शित करायला हवं”, असं नवनीत राणा यांनी म्हटलं आहे.

पुढे त्या म्हणाल्या, “एखाद्या चित्रपटाला किंवा इतर कोणत्याही गोष्टीला बॉयकॉट करण्यापेक्षा आक्षेपार्ह किंवा भावना दुखावणारे दृश्य असतील तर सेन्सॉरनं ते पाहायला हवं. त्यानंतर त्यात एडिट करुनच ते प्रदर्शित करायला हवं. कारण शेवटी सिनेसृष्टीतून मोठी आर्थिक उलाढाल होत असते. यामुळे देशाला आर्थिकरित्या आधार मिळत असतो.”

“या गोष्टींचा मी सकारात्मकरित्याच विचार करतेय. मला असं वाटतं की जर कोणत्या गोष्टीमुळे आपल्या भावना दुखावल्या जात असतील तर सेन्सॉर बोर्ड आहे, त्यांनी त्यांचं काम करायला हवं. आम्हीही फार सकारात्मक पद्धतीनेच याचा विचार करत आहोत की देशभरातील कलाकारांच्या चित्रपटांना बॉयकॉट करु नये. कारण त्यांचा आपल्या देशातील आर्थिक जडणघडणीत फार मोठा वाटा आहे”, असंही राणा म्हणाल्या.

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये