देश - विदेशलेखसंडे फिचर

राजमुद्रेच्या भावमुद्रा

Reality Check | अ‍ॅड. महेश भोसले |

सारनाथ येथील अशोकस्तंभावरून भारताची राजमुद्रा घेतलेली आहे. भारताच्या पहिल्या प्रजासत्ताकदिनी ही राजमुद्रा आपण स्वीकारलेली आहे. सारनाथ येथील स्तंभावर चार सिंह आहेत. तसेच खाली पूर्वेला हत्ती, पश्चिमेला घोडा, दक्षिणेला बैल आणि पाठीमागे एक सिंह कोरलेला असून हे चार सिंह चार दिशेला पाहत आहेत. मध्यभागी अशोकचक्र आहे. अशोकचक्राच्या एका बाजूला घोडा आणि एका बाजूला बैल असून खाली देवनागरीमध्ये “सत्यमेव जयते” असे लिहिलेले आहे. ही राजमुद्रा हा आपला राष्ट्रीय आणि ऐतिहासिक ऐवज आहे. त्यामध्ये बदल करणे ही इतिहासाशी केलेली छेडखानी असेल हे सर्वांनी समजून
घेतले पाहिजे.

दिल्लीत उभ्या राहणाऱ्या सेन्ट्रल व्हिस्टामध्ये २६ फुट उंचीच्या राजमुद्रा अनावरणाचा कार्यक्रम देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते पार पडला. सेन्ट्रल व्हिस्टामध्ये बसवलेली ही भव्य राजमुद्रा ही तमाम भारतीयांसाठी एक अभिमानाची बाब आहे. परंतु असे असले तरीही या राजमुद्रेतील मुद्रा या मूळ राजमुद्रेतील मुद्रेशी साम्य सांगत नाहीत, हे पाहताच स्पष्टपणे दिसते. मूळ राजमुद्रेतील सिंह हे शांत चार दिशेला पाहत आहेत. या राजमुद्रेतील सिंह हे जबडा उघडलेले आणि आक्रमक दिसत आहेत. तसेच हत्ती, घोडा आणि बैल यांच्यात आणि या नवीन राजमुद्रेतदेखील पाहताच बदल दिसत आहेत.

ही नवीन राजमुद्रा आपल्या महाराष्ट्रातील औरंगाबाद येथील देवकरबंधूंनी तयार केली आहे. खरेतर ही आपल्यासाठी अभिमानाची गोष्ट आहे. परंतु या बदललेल्या भावमुद्रेवर बोलताना त्यांनी सांगितलेले कारण हे पटणारे नाही. ते सांगतात की, या नवीन राजमुद्रेचे जे फोटो आहेत, ते चुकीच्या अंगाने काढलेले आहेत, म्हणून ते जुन्या राजमुद्रेपेक्षा वेगळे वाटत आहेत. हे अतिशय हास्यास्पद आहे. जुन्या राजमुद्रेचे फोटो कुठल्याही बाजूने काढले तरीही ते सिंह कधी आक्रमक नाहीत दिसत. एकवेळ चर्चेसाठी आपण त्यांच्या दाव्यावर विश्वास ठेवूदेखील, परंतु बैलाचे, हत्तीचे पाय यातील बदल तर अतिशय स्पष्ट दिसत आहेत, हे तरी त्यांनी मान्य करायला हवे. कलाकार म्हणून दोन गोष्टी असतात. एक म्हणजे कलाकाराचे व्यक्तीस्वातंत्र्य आणि त्याचे कसब. इथे ऐतिहासिक राजमुद्रा जशी आहे, तशी सांगितलेल्या आकारात बनवणे हे काम आहे. त्यामुळे इथे कलाकाराच्या स्वातंत्र्याला वाव नाही. कारण ऐतिहासिक ऐवजामध्ये बदल करणे म्हणजे इतिहासाची मोडतोड करणे होय.

एखादी गोष्ट आपण इतिहास म्हणून स्वीकारली तर त्याला भक्कम पुरावे मिळवूनच आपण त्यामध्ये बदल करू शकतो. परंतु या बाबीमध्ये तेपण बसत नाही. कारण सारनाथ येथील त्या शिल्पाला आपण स्वीकारले आहे आणि जे आहे ते समोर आहे, त्यामुळे त्यामध्ये बदल करता येणार नाही. मग दुसरा मुद्दा येतो, तो म्हणजे कसब. हुबेहूब राजमुद्रा बनवण्यात देवकरबंधूंचे कसब कमी पडले का, हादेखील एक मुद्दा असू शकतो. पण हा मुद्दा असेल असे मला वाटत नाही, कारण ज्यांनी त्यांना कामाचे टेंडर दिले आहे, त्यांनी असे बदल स्वीकारलेच नसते. म्हणजे यामध्ये अजून एक तिसरा मुद्दा असा असू शकतो की, त्यांना ज्यांनी हे काम करायला सांगितले होते. कदाचित त्यांनीच हे बदल करायला लावले असतील. तसे असेल तर एक कलाकार म्हणून ऐतिहासिक वारशात बदल करण्याचे पातक देवकरबंधूंनी केले आहे, हे सिद्ध होते. तसेच ज्यांनी त्यांना या कामाचे आदेश दिले आहेत तेदेखील या प्रकरणात चूक आहेत. त्यांनी दिलेली कामाच्या आदेशाची प्रत पाहून खरेतर कार्यवाही व्हायला हवी.

The Emblems and Names (Prevention of Improper Use) Act १९५० या कायद्यानुसार भारतीय राजमुद्रेचा चुकीचा आणि गैरवापर कोणीही करू शकत नाही. असे केलेले आढळल्यास दंड आणि शिक्षेची तरतूद आहे. आता राजमुद्रेसारखी दिसणारी मूर्ती सेन्ट्रल व्हिस्टामध्ये बसवली गेली आणि त्याचा गैरवापर केला गेला, असे ग्राह्य धरून कायदा त्यामध्ये हस्तक्षेप करू शकतो. पण जे हे कायदा बनवणाऱ्या लोकांनीच केले तर काय करणार?

सिंह आक्रमक असो की शांत. तो शूर आहे, हे सर्वांना मान्य आहे. मग आक्रमक भावमुद्रा दाखवण्यामागे काय हेतू असेल नेमका? आपला देश बुद्धाचा वारसा सांगणारा, शांतताप्रिय आणि अहिंसक म्हणून ओळखला जातो. कुठल्याही प्रकारची हिंसा ही केवळ अशांतता प्रस्थापित करीत असते, हे सर्वज्ञात आहे. असे असताना हिंसक प्रतीके का निर्माण केली जात आहेत? राजमुद्रेतील चार दिशेला लक्ष ठेवणारे सिंह आणि त्यामुळे इथे “सत्यमेव जयते” आहे हे संबोधणारे प्रतीक हिंसक वृत्तीने दाखवण्यामागे नेमका काय हेतू असू शकतो? सीतेच्याशेजारी असलेला राम दूर करून त्याचे हाती धनुष्यबाण दिलेला आक्रमक राम दाखवणे, शास्त्रज्ञ असलेल्या डॉ. अब्दुल कलाम यांच्या हातात वीणा देणे आणि आता हे राजमुद्रेचे केलेले विडंबन हे सर्व काय आहे? प्रतीके बदलून, ऐतिहासिक ठेवा असलेल्या गोष्टीत बदल करून कुठली नवीन विचारसरणी आपल्यावर अतिक्रमण करू पाहत तर नाही ना, याचादेखील विचार व्हायला हवा.

वरकरणी हे खूप न लक्ष देण्यासारखे वाटत असले तर ही आपली चूक आहे. आधी इतिहासातील प्रतीके मुंगीच्या पावलाने बदलायचे आणि कालांतराने हवा तसा इतिहास लिहून पूर्ण इतिहास हवा तसा बदलायचा. हे एक दूरदृष्टीने करायच्या बदलाकडे उचललेले पाऊल तर नाही ना? येणाऱ्या काळात आपल्याला अजून सावध राहायला हवे.

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये