रचिन रवींद्रच्या शतकाच्या जोरावर न्यूझीलंडने उभारला धावांचा डोंगर, पाकिस्तानला दिले ४०२ धावांचे लक्ष्य
New Zealand vs Pakistan ICC World Cup 2023 : आयसीसी विश्वचषक २०२३ चा ३५ वा सामना पाकिस्तान विरुद्ध न्यूझीलंड यांच्यात खेळला जात आहे. पाकिस्तानने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. पाकिस्तानचा हा निर्णय न्यूझीलंडच्या केन विल्यमसन आणि रचिन रवींद्रने चुकीचा ठरवला. कारण नाणेफेक हारल्यानंतर किवी संघाने प्रथम फलंदाजी करताना ५० षटकांत ६ गडी गमावून ४०१ धावा केल्या. न्यूझीलंडने पाकिस्तानला ४०२ धावांचे लक्ष्य दिले आहे. रचिन रवींद्रने १०८ आणि कर्णधार केन विल्यमसनने ९५ धावा केल्या. पाकिस्तानकडून मोहम्मद वसीम ज्युनियरने तीन विकेट्स घेतल्या घेतले.
न्यूझीलंड संघाची प्रथम फलंदाजी करताना सुरुवात चांगली झाली. डेव्हॉन कॉनवे आणि रचिन रवींद्र यांनी पहिल्या विकेटसाठी ६८ धावांची भागीदारी केली. कॉनवे ३९ चेंडूत ३५ धावा करून बाद झाला. यानंतर दुखापतीतून परतणाऱ्या केन विल्यमसनने रचिन रवींद्रसोबत १८० धावांची भागीदारी केली. दरम्यान, रचिनने या विश्वचषकातील तिसरे शतक झळकावले. एकाच विश्वचषकात तीन शतके झळकावणारा तो न्यूझीलंडचा पहिला खेळाडू ठरला आहे.
त्याचबरोबर केल विल्यमसनने ७९ चेंडूंत १० चौकार आणि दोन षटकारांच्या मदतीने ९५ धावा करून बाद झाला. शतक झळकावल्यानंतर रचिन रवींद्र बाद झाला. तो ९४ चेंडूंत १५ चौकार आणि १ षटकाराच्या मदतीने १०८ धावा करून बाद झाला. यानंतर डॅरिल मिशेलने १८ चेंडूत २९ धावा, मार्क चॅपमनने २७ चेंडूत ३९ धावा, ग्लेन फिलिप्सने २५ चेंडूत ४१ धावा केल्या. मिचेल सँटनर १७ चेंडूत २६ धावा करून नाबाद राहिला आणि टॉम लॅथम २ धावांवर नाबाद राहिला. वसीमशिवाय हसन अली, इफ्तिखार अहमद आणि हारिस रौफ यांना प्रत्येकी एक विकेट मिळाली.
रचिन रवींद्रने आज पाकिस्तानविरुद्ध जगातील तिसरे शतक झळकावले. त्याने या विश्वचषकात पाचव्यांदा ५०हून अधिक धावा केल्या. रचिनने जवळपास सर्वच संघांविरुद्ध धावा केल्या आहेत. पाकिस्तानविरुद्ध शतक झळकावल्यानंतर त्याने विराट कोहलीलाही मागे टाकले आहे. या विश्वचषकात विराट कोहलीने आतापर्यंत ४४२ धावा केल्या आहेत. त्याचवेळी रचिन रवींद्रने कोहलीला मागे टाकत ५२३ धावा केल्या आहेत. मात्र, रचिनने ८ सामन्यात ५२३ धावा केल्या आहेत, तर कोहलीने केवळ ७ सामने खेळले आहेत.