पाकिस्तानला सेमी फायनलचे डोहाळे! गोलंदाजीने मारलं, फखर जमान अन् पावसानं तारलं
New Zealand vs Pakistan World Cup 2023 : पाकिस्तानने या वर्ल्ड कपमध्ये पुन्हा एकदा टेबल फिरवले आहेत. या संघाने डकवर्थ लुईस नियमामुळे न्यूझीलंडविरुद्धचा सामना २१ धावांनी जिंकला. त्यामुळे पाकिस्तानी संघाला सेमीफायनचे डोहाळे लागले आहेत.
सामन्याबद्दल बोलायचे झाले तर, न्यूझीलंडची सुरुवात चांगली झाली होती. डेव्हॉन कॉनवे आणि रचिन रवींद्र यांनी पहिल्या विकेटसाठी 68 धावांची भागीदारी केली. पण कॉनवे 39 चेंडूत 35 धावा करून बाद झाला. यानंतर दुखापतीतून परतणाऱ्या केन विल्यमसनने रचिन रवींद्रसोबत 180 धावांची भागीदारी केली.
दरम्यान, रचिनने या वर्ल्ड कपमधील तिसरे शतक ठोकले. एकाच वर्ल्ड कपमध्ये तीन शतके ठोकणारा रचिन न्यूझीलंडचा पहिला खेळाडू ठरला आहे. तर विल्यमसन 79 चेंडूंत 10 चौकार आणि 2 षटकारांच्या मदतीने 95 धावा करून बाद झाला.
शतक झळकावल्यानंतर रचिननेही आऊट झाला, त्याने 94 चेंडूंत 15 चौकार आणि 1 षटकाराच्या मदतीने 108 धावा केल्या. यानंतर डॅरिल मिशेलने 18 चेंडूत 29 धावा, मार्क चॅपमनने 27 चेंडूत 39 धावा, ग्लेन फिलिप्सने 25 चेंडूत 41 धावा केल्या.
तर मिचेल सँटनर 17 चेंडूत 26 धावा करून नाबाद राहिला आणि टॉम लॅथम 2 धावांवर नाबाद राहिला. या सामन्यात पाकिस्तानकडून वसीमशिवाय हसन अली, इफ्तिखार अहमद आणि हारिस रौफ यांना प्रत्येकी एक विकेट घेतली. शाहीन आफ्रिदीने या सामन्यात 90 धावा दिल्या आणि त्याला एकही विकेट मिळाली नाही. 24 एकदिवसीय डावात शाहीन आफ्रिदी विकेट रहित राहण्याची ही पहिलीच वेळ आहे.