नांदेडपाठोपाठ नाशिकही हादरलं! नवजात बालकाचा मृत्यू, प्रसुतीदरम्यान बाळ हातातून सटकलं अन्…

नाशिक | Nashik News – नांदेडच्या (Nanded) शासकीय रूग्णालयात 35 रूग्णांचा मृत्यू झाल्यामुळे सगळीकडे एकच खळबळ उडाली आहे. एकिकडे नांदेडमध्ये ही घटना घडली असतानाच दुसरीकडे नाशिकमधून (Nashik) एक धक्कादायक घटना समोर आली आहे. नाशिकमध्ये एका नवजात बालकाचा मृत्यू झाला आहे. प्रसुतीदरम्यान या बालकाचा मृत्यू झाल्यानं खळबळ उडाली आहे.
नाशिकमध्ये प्रसुतीदरम्यान बाळ हातातून सटकल्याने त्या बाळाचा मृत्यू झाला आहे. या धक्कादायक प्रकारानंतर कुटुंबियांनी रूग्ण्यालयात एकच गोंधळ घातला. रूग्णालयातील ही परिस्थिती हाताबाहेर जात असल्यामुळे शेवटी पोलिसांना पाचारण करावं लागलं.
सोमवारी फाल्गुनी जाधव या प्रसुतीसाठी वैद्यकीय महाविद्यालयात दाखल झाल्या होत्या. त्यानंतर डॉक्टरांनी फाल्गुनीला बाळाच्या हृदयाचे ठोके दाखवून तिची प्रसुती करण्याचा निर्णय घेतला. पण प्रसुतीदरम्यान डॉक्टरांच्या हातातून बाळ सटकल्याने ते खाली पडले आणि त्याचा मृत्यू झाला असल्याचा आरोप फाल्गुनीच्या पतीनं केला आहे.
बाळाचा मृत्यू झाल्यानंतर त्याबाबतची माहिती कुटुंबियांना बराच वेळ देण्यात आली नव्हती. पण नंतर याबाबतची माहिती समजताच कुटुंबियांनी रूग्णालयात एकच गोंधळ केला. तर याप्रकरणी आडगाव पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान, बाळाचा आधीच मृत्यू झाला असल्याचा दावा महाविद्यालयातील अधिक्षकांनी केला आहे.