नीरवच्या साथीदाराला कैरोत बेड्या

इजिप्त देशामध्ये सीबीआयचे ऑपरेशन
नवी दिल्ली : पंजाब नॅशनल बँक प्रकरणातील मुख्य आरोपी आणि फरार व्यावसायिक नीरव मोदी याचा साथीदार सुभाष शंकर याला इजिप्तची राजधानी कैरो येथे बेड्या ठोकल्या आहेत. येथून त्याला परत आणण्यात केंद्रीय अन्वेषण विभागाला (सीबीआय) यश आले आहे.
४९ वर्षीय सुभाष शंकर २०१८ मध्ये नीरव मोदीसोबत भारतातून पळून गेला होता. सुभाष शंकरला भारतात आणल्यानंतर सीबीआय आता सुभाष शंकरला मुंबई न्यायालयात हजर करणार आहे. पीएनबी घोटाळ्याप्रकरणी त्याची चौकशी केली जाणार आहे.
मालमत्ता ताब्यात घेणार…
नीरव मोदीनं पीएनबी बँकेत सुमारे ६,५०० कोटी रुपयांचा घोटाळा केला होता. तो लंडनमधील तुरुंगात आहे. त्याला परत आणण्यासाठी भारत सरकार प्रयत्न करीत आहे. ईडी नीरव मोदीच्या परदेशातील मालमत्ता ताब्यात घेण्याचा प्रयत्न करीत आहे. नीरव मोदीनं २०१७ मध्ये त्याच्या कंपनी फायरस्टार डायमंड्सद्वारे आयकॉनिक रिदम हाऊस इमारत खरेदी केली होती. त्याचे हेरिटेज प्रॉपर्टीमध्ये रूपांतर करण्याची त्यांची योजना होती. पीएनबी घोटाळ्यातून मिळालेल्या पैशातून त्याने बहुतांश मालमत्ता खरेदी केल्याची माहिती मिळत आहे.
२०१८ मध्ये, इंटरपोलनं पीएनबी घोटाळ्याची चौकशी करणार्या सीबीआयच्या विनंतीवरून नीरव मोदी, त्याचा भाऊ निशाल मोदी आणि त्याचा कर्मचारी सुभाष शंकर यांच्याविरुद्ध रेड कॉर्नर नोटीस जारी केली होती. इंटरपोलनं चार वर्षांपूर्वी मुंबईतील विशेष न्यायालयात रेड कॉर्नर नोटीस जारी केली होती.