…तर बावनकुळेंना मुख्यमंत्री होण्याची संधी, नितीन गडकरींच्या वक्तव्याने चर्चेला उधाण!

नागपूर : (Nitiin Gadkari On devendra fadnavis) आपला पक्ष हा आई मुलाचा पक्ष नाही, भाजप पक्ष हा सर्वसामान्य कार्यकर्त्यांचा पक्ष आहे. पक्षातील आमदार-खासदारांनी लक्षात ठेवा, आपल्या पोरा-पोरींसाठी तिकीटं मागू नका. जरी कुणी मागितलीच तर त्यासाठी माझा ठाम विरोध असेन. जनतेने तुमच्या मुलांसाठी तिकीटं मागितली पाहिजे, असं केंद्रीय मंत्री नितीन गडकरी म्हणाले.
भाजपचे नवनिर्वाचित प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांचा सत्कार समारंभ नागपूरमध्ये आयोजित करण्यात आला होता. यावेळी आयोजित समारंभाला नितीन गडकरी, देवेंद्र फडणवीस, चंद्रशेखर बावनकुळे, तसेच नागपूरचे भाजप पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. यानिमित्ताने केलेल्या भाषणात गडकरींनी तुफान फटकेबाजी केली.
बावनकुळे रात्रंदिवस काम करणारा कार्यकर्ता आहे. आपल्या कामाने वंचित पीडितांना त्यांनी नेहमी न्याय दिला. जनतेचं प्रेम मिळवलं. घरची गरिबी असताना त्यांनी त्या परिस्थितीतही स्वत:चा, कुटुंबाचा विचार न करता पक्षाचं काम केलं. म्हणून देवेंद्र फडणवीस जर दिल्लीत गेले तर चंद्रशेखर बावनकुळेंना मुख्यमंत्री होण्याची संधी आहे”, असं मोठं विधान केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी केलं आहे.