…हे नि तीन कारणे
नितीन गडकरी सध्या वैफल्यात असल्यासारखे बोलत आहेत. भारतीय जनता पक्षातून त्यांच्याकडे होत असलेले दुर्लक्ष हे नि तीन कारणे त्यांच्या निराशेची आणि कार्यकर्त्यांना केल्या जाणाऱ्या उपदेशाची आहेत.
भारतीय जनता पक्षाची एक कार्यपद्धती होती. तात्त्विकता, निष्ठा, कर्तव्य, राष्ट्र प्रथम, सेवाधर्म अशा विविध मूल्यांच्या पायावर भाजप २०१४ सालापर्यंत काम करत होता. राष्ट्रीय स्वयंसेवक संघ ही सकृतदर्शनी राजकारणविरहित सांस्कृतिक, परंपरा जपणारी, राष्ट्रभक्ती शिकवणारी अराजकीय संघटना होती. ज्याची एक शाखा राजकारण करण्यासाठी भाजप ही आहे. जवळपास ६० वर्षे विरोधक म्हणून काम करताना भाजप, त्यापूर्वी जनसंघाने, जनता पक्षाने ही मूल्ये जपली होती.
मात्र आयुष्यभर विरोधी पक्ष, रस्त्यावर आंदोलने करणे अमान्य झाल्याची ‘राष्ट्रीय’ जाणीव झाल्याने भव्य, दिव्य, उदात्त, महन्मंगल तत्त्वांचा मुलामा घेऊन भाजपने २०१४ साली कार्यप्रणालीची कात टाकली. आक्रमकता, नवनवीन संसाधने, माहिती तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर करणारा पक्ष म्हणून भाजपचा उदय झाला. या सगळ्या तंत्राला ज्यांनी आत्मसात केले किंवा करू शकतात ते टिकले. ज्यांना निवडणूक जिंकण्यापासून निवडणूक हरल्यावरही करामती करत सत्ता मिळण्याचे कसब प्राप्त आहे, त्यांचे भाजपतील स्थान आता अबाधित आहे.
नव्या पिढीमध्ये असणारे आपले अंतर जुन्या पिढीने मान्य केले पाहिजे. लालकृष्ण अडवाणी, मुरली मनोहर जोशी आदींची पिढी आता इतिहासजमा झाली. स्वातंत्र्यानंतर अडगळीत गेलेली ही पहिली पिढी असे ठरवले तर, अडगळीत पडणारी दुसरी पिढी नितीन गडकरी यांची असेल. एकनाथ खडसेंच्या पिढीचे गडकरी आता त्याच मार्गावर वाटचाल करत आहेत. आपला उज्ज्वल भविष्यकाळ २०२४ सालापर्यंतच आहे याची त्यांना नक्कीच जाणीव, नव्हे ठाम विश्वास असावा. साहजिकच २०२४ नंतर आपलं अस्तित्व शोधण्याचा, समजून घेण्याचा प्रयत्न आणि त्याची रास्त जाणीव, तसेच परिणाम लक्षात आल्यामुळे त्यांची भाषा आता, “उरलो उपकारापुरता” अशी झाली आहे.
गेल्या दीड-पावणे दोन वर्षात त्यांनी मुलाखत, तसेच भाषणांतून भाजपबद्दलची आपली खंत, नाराजी, असमाधान वारंवार व्यक्त केले आहे. राजकारणाशिवाय खूप चांगल्या गोष्टी करण्यासारख्या आहेत असेही ते जाहीर बोलले आहेत. राजकारणातही चांगल्या गोष्टी करण्याची त्यांना संधी आली होती. मात्र त्यांच्यावरच्या संशयाने ती त्यांना पार पाडता आली नाही. भाजपचे २००९ सालात ते अध्यक्ष होते. पन्नासाव्या वर्षात त्यांना हे पद मिळाले होते. महाराष्ट्राच्या विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते ते त्यापूर्वी होते, तर युती सरकारमध्ये राज्याचे कॅबिनेट मंत्री होते. या काळात त्यांनी निर्माण केलेल्या एक्सप्रेस वे चे म्हणजेच चांगल्या कामाचे कौतुकही झाले. आज ते कौतुक देशभरात महामार्ग बांधण्यासाठी उपयोगात येत आहे. मात्र विरोधकांशीही त्यांचे मधुर संबंध होते. विशेषतः शरद पवार यांच्याबरोबर त्यांचा असणारा स्नेह त्यांच्या कारकिर्दीत अडसर ठरला अशी कुजबुज भाजपच्या गोटात आहे .
नितीन गडकरी निराशा, वैफल्याने जे बोलत आहेत त्याची तीन कारणे आहेत. पहिले कारण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यापेक्षा रेशीमबागच्या खूप जवळचे असूनही आणि राज्याच्या, देशाच्या राजकारणात मोदी यांच्या अगोदरपासून असूनही ते पंतप्रधान होऊ शकले नाहीत. ते पद त्यांना मिळाले नाही हे शल्य त्यांना नक्कीच आहे. दुसरे कारण म्हणजे भारतीय जनता पक्षातली त्यांची आजची गरज संपली आहे, ते त्यांच्या बळावर राजकारणात मोठी उलथापालथ करू शकतील अशी शक्यता नाही.
गोव्यात ऑपरेशन लोटस करून दाखवले ही त्यांची पक्षासाठीची शेवटची मोठी कामगिरी. मात्र त्यानंतर देवेंद्र फडणवीस यांनी गेलेले महाराष्ट्र राज्य ज्या प्रकारे पुन्हा मिळवले, केवळ शिवसेनाच नव्हे तर राष्ट्रवादीलाही विशेषतः शरद पवार यांना जो धोबीपछाड दिला त्यासमोर गडकरींची कामगिरी झाकोळली गेली. वर्षात दोनवेळा ४० च्या वर आमदार फोडून दाखवायचे कौशल्य गडकरींमध्ये उरले नाही व पंतप्रधानांशी सूत न जुळल्याने ते कौशल्य त्यांना पणालाही लावता येणार नाही.
तिसरे कारण म्हणजे तब्येत, विचार, कृतिशीलता यावर बंधने आली आहेत. संघटनेवरची त्यांची पकड आता ढिली झाली असल्याने त्यांना भाजप सोडता येणार नाही. दुसऱ्या पक्षात ते जाऊ शकत नाहीत. सबब भाजपने दुर्लक्ष केले तैरी भाजपचे होऊन राहण्याशिवाय आगामी काळात त्यांच्याजवळ पर्याय नाही. आपले अस्तित्व दाखवण्यासाठी भारतीय जनता पक्षाला त्यातील कार्यकर्त्यांना आणि नेत्यांना उपदेशाचे डोस शक्य तितके सौम्य करून पाजण्या पलीकडे त्यांच्या हातात काहीच उरले नाही.