कंत्राटदाराने काम केले नाही तर बुलडोझर चालवू; नितीन गडकरी यांचे संसदेत वक्तव्य
कंत्राटदाराने नीट काम केले नाही तर त्याला बुलडोझरखाली टाकू, असे मी जाहीर सभेत सांगितले आहे. आम्ही अजिबात तडजोड करणार नाही. दिल्ली-मुंबई द्रुतगती महामार्गाच्या बांधकामात त्रुटी आढळल्यास चार कंत्राटदारांना जबाबदार धरण्यात आले असून त्यांच्यावर कडक कारवाई करण्यात येईल, असे नितीन गडकरी यांनी सभागृहाला सांगितले.
लोकसभेत प्रश्नोत्तराच्या तासात पुरवणी प्रश्नांना उत्तर देताना ते म्हणाले की, आयआयटी खरगपूर आणि आयआयटी गांधीनगरच्या तज्ज्ञांनी एक्स्प्रेस वेची पाहणी केली आणि त्याच्या बांधकामात त्रुटी आढळल्या. रस्ते बांधणीचा वेग आणि गुणवत्तेशी तडजोड न करण्याची ख्याती असलेल्या नितीन गडकरी यांनी संसदेत मोठं वक्तव्य केलं आहे. जे कंत्राटदार योग्य काम करणार नाहीत, त्यांच्यावर कारवाई केली जाईल, असे मी यापूर्वीच म्हटले आहे, असे त्यांनी गुरुवारी लोकसभेत एका प्रश्नाच्या उत्तरात सांगितले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली आमच्या विभागाने ५० लाख कोटी रुपयांची कामे केली आहेत. आम्ही पारदर्शक, कालबद्ध, परिणामाभिमुख आहोत, असेही ते म्हणाले.
आम्ही चार कंत्राटदारांना नोटिसा बजावल्या असून, त्यांना काळ्या यादीत टाकू. कडक कारवाई केली जाईल. तसेच संबंधित अधिकाऱ्यांवर ही कारवाई करण्यात येणार आहे. दिल्ली-मुंबई द्रुतगती महामार्ग हा देशातील सर्वात लांब रस्ता असून तो कमीत कमी वेळेत तयार करण्यात आला आहे. रस्ते बांधणीत दिरंगाई झाल्यास त्यास जबाबदार अधिकाऱ्यांची नावे जाहीर केली जातील, असा इशाराही नितीन गडकरी यांनी अनेकदा अधिकाऱ्यांना दिला. चांगल्या कामाचे बक्षीस दिले तर चुकीच्या कामासाठी त्यांचा पर्दाफाश करणेही गरजेचे आहे, असे ते म्हणाले.