नितीशकुमारांचा मोदींच्या पाउलावर पाउल! PM ने २०१४ ला जे केलं तेच करणार, भाजपच्या अडचणी वाढणार?
पाटणा : (Nitishkumar On Narendra Modi) आगामी लोकसभेच्या निवडणुकांच्या पार्श्वभुमी बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार हे लोकसभेची आगामी निवडणूक उत्तर प्रदेशातून लढवणार असल्याच्या चर्चेमुळे बिहारमधील सत्ताधारी महाआघाडी आणि राज्यातील विरोधी पक्ष भाजप यांच्यात नवा वाद सुरू झाला आहे.
नितीशकुमार यांनी २०२४ मध्ये भाजपच्या नेतृत्वाखालील ‘एनडीए’चा पराभव करण्याची प्रतिज्ञा करत मागील वर्षी ‘एनडीए’ला सोडचिठ्ठी दिली. तेव्हापासूनच, त्यांच्याकडून स्व. पं. जवाहरलाल नेहरू यांचा मतदारसंघ म्हणून प्रसिद्ध असलेल्या फुलपूरमधून निवडणूक लढविण्याची जोरदार अटकळ बांधली जात आहे. प्रयागराज शहराचा बराच भाग फूलपूर मतदारसंघात येतो आणि येथे नितीशकुमार यांच्या कुर्मी समाजाची लोकसंख्या मोठी आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाराणसी मतदारसंघापासून फूलपूर हे शंभर किमीवर आहे. पंतप्रधान मोदी यांचा मतदारसंघ असलेल्या तसेच, पक्षाचे उगवते नेतृत्व म्हणून पाहिले जात असलेले योगी आदित्यनाथ यांचे राज्य असलेल्या उत्तर प्रदेशातून नितीश यांच्या उमेदवारीची चर्चा झाल्याने भाजपने तीव्र प्रतिक्रिया दिली आहे. नितीश यांची लोकप्रियता स्वत:च्या राज्यात घटल्यानेच ते शेजारच्या राज्याकडे वळले आहेत, असा दावा भाजपने केला आहे.