Raj Thackeray: राज्यातील जुने टोलनाके बंद होणार? राज ठाकरे-दादा भुसे यांच्यात चर्चा; घेतले ‘हे’ मोठे निर्णय
मुंबई | Raj Thackeray – आज (13 ऑक्टोबर) मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) आणि राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री दादा भुसे (Dada Bhuse) यांच्यात टोलनाक्यासंदर्भात चर्चा झाली. ही चर्चा सकारात्मक झाली असून यामध्ये अनेक मोठे निर्णय घेण्यात आल्याची माहिती राज ठाकरेंनी दिली. तर राज्यातील जुने टोलनाके बंद करण्यात येणार असून त्यावर निर्णय घेण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी एक महिन्याचा वेळ मागून घेतला असल्याची माहिती, राज ठाकरेंनी दिली.
राज ठाकरेंनी माध्यमांशी बोलताना सांगितलं की, राज्यातील 44 जुने टोलनाके बंद करण्यात यावेत अशी आमची मागणी होती. तर यावर निर्णय घेण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी एक महिन्यांचा कालावधी मागून घेतला आहे. तर याबाबत एक महिन्यात निर्णय घेतला जाणार असल्याचं आश्वासन एकनाथ शिंदेंनी दिलं आहे. त्यामुळे जुने टोलनाके बंद होतील अशी आम्हाला आशा आहे.
येत्या 15 दिवसांमध्ये सरकार मुंबईच्या पाचही एन्ट्री पॉइंटवर सीसीटीव्ही कॅमेरे लावणार आहे. मंत्रालयात याचा कंट्रोलरूम असणार आहे. सरकारसोबत आमचे देखील सीसीटीव्ही कॅमेरे एन्ट्री पॉइंटवर असणार आहेत. तर टोलनाक्यावरून दररोज किती गाड्यांची ये जा होते हे मोजलं जाणार आहे, अशी माहितीही राज ठाकरेंनी दिली.