जुलै अखेर भात लागवड पूर्ण होईल
मावळ तालुक्यातील खरीप भात पिकाच्या लागवडी अखेरच्या टप्प्यात आहेत. येत्या आठ ते दहा दिवसात तालुक्यातील सुमारे १३ हजार हेक्टर क्षेत्रावरील सर्व लागवडी पूर्ण होतील असा विश्वास मावळ तालुका कृषी अधिकारी दत्तात्रय पडवळ यांनी व्यक्त केला आहे. जुलै महिन्याच्या सुरुवातीपासून या भात लागवडीला सुरुवात झाली असून जुलै अखेर पर्यंत तालुक्यातील सर्व भात लागवड पूर्ण होण्याचा अंदाज आहे.
मावळ तालुका हा भात पिकाचे आगर असून या तालुक्यातील लागवडी खालील क्षेत्र हे सुमारे १३ हजार हेक्टर क्षेत्र आहे. जुलै महिन्याच्या पहिल्या आठवड्यापासून मावळ तालुक्यातील भात लागवडीला सुरुवात झाली आहे. जुलै महिन्यात खरीप भात पिकाच्या लागवडी गावोगावी गेली महिनाभर चालू आहेत यामुळे आतापर्यंत मावळ तालुक्यात सुमारे ७० ते ८० टक्के पर्यंत भात लागवडी उरकल्या आहेत. त्यामुळे शेतकरी खऱ्या अर्थाने आता शेतीच्या कामातून मोकळा झालेला दिसत आहे.
जुलैच्या पहिल्या आठवड्यापासून मावळ तालुक्यात जोरदार मान्सूनचा पाऊस पडत असल्याने भात खाचरांमध्ये चांगले पाणी साठले होते. त्यामुळे आपापल्या शेतातल्या भात पिकाच्या लागवडी पूर्ण करणे शेतकऱ्यांना सोपे गेले.
यावर्षी जून महिना कोरडा गेल्याने शेतकऱ्यांच्या भात लावणीची कामे रखडली होती मात्र मान्सूनने जुलै महिन्यात जोरदार सुरुवात केली आणि शेतकरी यांना दिलासा दिला. एकाच वेळी सर्व गावांमध्ये भातलावणीची कामे सुरू झाल्याने भात लावणीसाठी लागणाऱ्या मजुरांची मोठी टंचाई निर्माण झाली होती. त्यामुळे काही शेतकऱ्यांना मिळेल त्या मजुरांसह आपल्या नात्यागोत्यातील पै पाहुण्यांना बोलावून भात लागवडी कराव्या लागल्या. आत्तापर्यंत तालुक्यात सुमारे ७० ते ८० टक्के लागवडी पूर्ण झाल्या असल्याचे तालुका कृषी अधिकारी दत्तात्रय पडवळ यांनी सांगितले.
पुढील आठवड्यात या सर्व लागवडी शंभर टक्के पूर्ण होतील असा भरोसा यावेळी त्यांनी व्यक्त केला आहे. पवन मावळाच्या पूर्वपट्यात सध्या भाताच्या लागवडी चांगला पाऊस पडत असल्याने केल्या जात असून त्याही लागवडी आठ ते दहा दिवसात पूर्ण होतील असे सहाय्यक कृषी अधिकारी अक्षय ढुमणे यांनी सांगितले. याशिवाय पश्चिम पट्ट्यातील सर्वच भागात लागवडी पूर्ण झालेल्या असून त्या ठिकाणच्या भात पिकाने चांगला जीव धरला असल्याचे नाणे मावळातील प्रगतशील शेतकरी गणपतराव भानुसघरे यांनी सांगितले. तर मान्सूनचा पाऊस अतिशय वेळेवर आणि पुरेसा होत असल्याने यावर्षी भात पीक चांगले आहे.असा अंदाजही त्यांनी व्यक्त केला.