ताज्या बातम्यामहाराष्ट्र

पद्मश्री दया पवार स्मृती पुरस्कार जाहीर; डॉ. गणेश देवी, जिग्नेश मेवाणी आणि चित्रकार राजू बाविस्कर ठरले मानकरी

मुंबई : साहित्य, सामाजिक आणि सांस्कृतिक क्षेत्रात अत्यंत प्रतिष्ठेचा म्हणून ओळखला जाणारा पद्मश्री दया पवार स्मृति पुरस्कार (Padmashri Daya Pawar Memorial Award) जाहीर झाला असून यंदाच्या पुरस्कारांसाठी ज्येष्ठ साहित्यिक आणि भाषातज्ज्ञ डॉ. गणेश देवी (Dr. Ganesh Devi) आणि सामाजिक कार्यकर्ते आणि गुजरातचे प्रभावी नेते, मानवी हक्क कार्यकर्ता आणि आमदार जिग्नेश मेवाणी (Jignesh Mevani) यांची निवड झाली. सोबतच ‘काळ्या निळ्या रेषा’ या आत्मचरित्रात्मक पुस्तकासाठी चित्रकार राजू बाविस्कर (Raju Baviskar) यांना यंदाचा ग्रंथाली पुरस्कृत ‘बलुतं’ पुरस्कार जाहीर झाला.

दया पवार स्मृति पुरस्काराचे यंदाचे हे रौप्य महोत्सवी वर्ष आहे. यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, मुंबई यांच्या सहकार्याने शुक्रवार (२७ ऑक्टोबर २०२३) रोजी सायंकाळी ६ वाजता यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, नरिमन पॉईंट, मुंबईच्या ‘रंगस्वर’ सभागृहात ज्येष्ठ संपादक आणि खासदार कुमार केतकर यांच्या अध्यक्षतेखाली दया पवार स्मृती पुरस्कार २०२३ वितरण सोहळा संपन्न होणार आहे.

या सोहळ्यादरम्यान कवी-अभिनेता अक्षय शिंपी यांचे कथाकथन आणि ‘झुंड’फेम विपीन तातड आणि माही जी. या रॅप क्षेत्रात सध्या धुमाकूळ घालणाऱ्या कलाकारांचा रॅप सादर होणार आहे. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन पत्रकार अलका धुपकर करणार आहेत. यंदाचा हा २५ वा पुरस्कार सोहळा असून प्रत्येकी १० हजार रुपये रोख आणि सन्मानचिन्ह असे या पुरस्काराचे स्वरूप आहे.

यासंबंधी अधिक माहिती देताना दया पवार प्रतिष्ठानचे सचिव प्रशांत पवार यांनी सांगितले की, दया पवार स्मृति पुरस्काराचे यंदाचे रौप्य महोत्सवी वर्ष आहे. सलग २५ वर्षे एखादी कृती सुरू ठेवणे हे आजच्या काळात सोपे नाही, मात्र प्रत्येक कार्यक्रमाला वाढत जाणारे जुन्या पिढीतले आणि नव्याने जोडले जाणारे दया पवारांचे तरुण चाहते या एकमेव गोष्टीमुळे दया पवार प्रतिष्ठानला हा कार्यक्रम करण्यासाठी नवीन उर्जा मिळत असते. सदर कार्यक्रम सर्वांसाठी खुला असून दया पवारांच्या चाहत्यांनी कार्यक्रमाला उपस्थित रहावे, असे आवाहन दया पवार प्रतिष्ठानच्या अध्यक्षा हिरा दया पवार यांनी केले.

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये