अभिनेत्री आदिती पोहनकरचे 9 वर्षांनंतर मराठी चित्रपटसृष्टीत पुनरागमन
मुंबई | अभिनेत्री आदिती पोहनकर (Aaditi Pohankar) 9 वर्षांनंतर मराठी चित्रपटसृष्टीत पुनरागमन करत आहे. मराठी चित्रपटसृष्टीतील तिचा शेवटचा चित्रपट निशिकांत कामतचा दिग्दर्तीत ‘लय भारी’ (2014) हा होता. आता ती ‘पहिले मी तुला’ (Pahile Mi Tula) या चित्रपटाद्वारे मराठी चित्रपटसृष्टीत परतण्यासाठी सज्ज झाली आहे. या चित्रपटात आदिती पोहनकर हिच्या सोबत अभिनेता भूषण पाटील (Bhushan Patil) हा मुख्य भूमिकेत दिसणार आहे.
‘पाहिले मी तुला’ या चित्रपटाचे पोस्टर नुकतेच प्रदर्शित झाले आहे. मनोज कोटियान दिग्दर्शित या चित्रपटात कौटुंबिक नाट्य असलेल्या या चित्रपटात आयुष आणि अलिशा यांच्या भूमिकेतील अदिती आणि भूषण यांची प्रेमकहाणी पहायला मिळणार आहे. त्यांचे प्रेम फुलणार की त्यात अडचणी येणार हे जाणून घेण्यासाठी आपल्याला प्रतीक्षा करावी लागेल.
चित्रपटाची कथा सारंग पवार आणि सुशील पाटील यांची आहे. पटकथा आणि संवादलेखन अभय अरुण इनामदार यांनी केलं आहे. मनोज कोटियान दिग्दर्शित या सिनेमाची निर्मिती निर्माते सुशील पाटील, निलेश लोणकर, अरविंद राजपूत यांनी एनएसके श्री फिल्म्स इंटरनॅशनलच्या बॅनरखाली केली असून, सिनेमास्टर्स एंटरटेन्मेंट प्रस्तुतकर्ते आहेत.
या चित्रपटात भूषण पाटील, अदिती पोहनकर, उदय टिकेकर, अतुल तोडणकर, सुहास परांजपे, माधव अभ्यंकर, शुभांगी लाटकर, सुहास परांजपे आणि अमृता पवार यांच्या भूमिका आहेत. हा चित्रपट 4 ऑगस्ट 2023 रोजी प्रदर्शित होणार आहे.