संपादकीय

नापाक इरादे…

पाकिस्तानचा राजकीय प्रवास नेहमीप्रमाणेच अडचणीचा ठरणार, यात शंका नाही. या सर्व प्रकरणांत इम्रान खान यांची राजकीय कारकीर्द दीर्घ काळ चालेल, हेही आता दिसत नाही. सत्ता मिळवण्याचे नापाक इरादे आता इम्रान भोगेल एवढे नक्की.

आपल्या शेजारील देशांमध्ये राजकीय, आर्थिक अस्थिरता निर्माण झाल्याचे स्पष्ट झाले आहे. रशिया-युक्रेन युद्धामुळे आणि त्यापूर्वी कोविडमुळे जागतिक अर्थव्यवस्था ढासळली होती. कोविडचे संकट कमी होत असताना सर्वच देशांना अर्थव्यवस्था उभारी घेईल असे वाटत होते. मात्र आशिया खंडात श्रीलंका, पाकिस्तान, चीन आणि नेपाळ या देशांना अर्थकारणाचा ढासळत डोलारा सांभाळणे दिवसेंदिवस अवघड होत आहे. श्रीलंकेचे अध्यक्ष राजपक्षे यांनी तर आपल्या जवाबदारीतून पळ काढला, तर नेपाळ आज आर्थिक समस्यांशी झुंजता-झुंजता धारशाही होईल की काय, असे वाटत आहे.

भारताशेजारी पाकिस्तान हा देश तर राजकीय अस्थिरतेच्या झोपाळ्यावर झोके घेत आहे. इम्रान खान यांच्यावर अविश्वासाचा प्रस्ताव दाखल करून त्यांची गच्छंती करण्यात आली. ३४२ सदस्य असलेल्या पाकिस्तानच्या कनिष्ठ सभागृहात बहुमतासाठी १७२ मतांची गरज असते. अविश्वास ठरावावर मतदान झाले. त्यात ठरावाच्या बाजूने १७४ मते पडली आणि इम्रान खान पाकिस्तानच्या पंतप्रधानपदावरून निष्कासित झाले. एकार्थी इम्रान खान हे सुदैवी म्हणावे लागतील. पाकिस्तानचा एकूणच इतिहास एक तर रक्तरंजित किंवा लष्करशाहीच्या जोरावर सत्ता मिळविण्याचा आहे. त्यामुळे अविश्वास प्रस्तावाद्वारे पंतप्रधानपदावरून बाहेर पडणारे इम्रान खान त्यांच्या देशातील पहिले पंतप्रधान म्हणावे लागतील. इम्रान खान यांनी अविश्वास प्रस्तावावरील मतदान टाळण्याचा कसोशीने प्रयत्न केला. गेले ८ दिवस त्यांनी न्यायालयाचे दरवाजे ठोठावणे आणि ती बरखास्त करण्यासाठी बरेच प्रयत्न केले, परंतु त्याला यश आले नाही. इम्रान खान तीन वर्षे आणि सात महिने पंतप्रधानपदावर राहिले.

भारताबद्दलचा द्वेष, तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याविरोधात गरळ ओकणे त्यांचे पंतप्रधानपदावर आल्यानंतरचे कार्य होते. पाकिस्तानमध्ये लोकप्रियता मिळवायची असेल आणि लष्कराच्या माध्यमातून सत्ता टिकवायची असेल, तर भारताला शिव्या-शाप देणे हा सगळ्यात सोपा मार्ग आहे. आतापर्यंत झालेल्या सर्व पंतप्रधानांनी हा मार्ग अवलंबला आणि सत्ता टिकवून ठेवली होती. इम्रान खान यांनीही तोच कित्ता गिरविला. मात्र कालांतराने त्यांनी पाकिस्तानी लष्कराला आव्हान देण्यास प्रारंभ केला आणि त्यामुळे त्याची गच्छंती अटळ होती. भारताला शिव्या शाप देणे या एका गुणवत्तेबरोबर ज्या पंतप्रधानांचे लष्कराशी संबंध चांगले आहेत अशीच व्यक्ती राज्यकारभार करू शकते. या दोनही कसोट्यांमध्ये इम्रान खान अनुत्तीर्ण होत गेले. पंतप्रधानपद सुटल्यावर तर त्यांनी भारताची प्रशंसा करणे सुरू केले, त्यामुळे आता त्यांच्या जीवितासही धोका असण्याची शंका नाकारता येत नाही. यापूर्वी पाकिस्तानात आजी-माजी पंतप्रधानांचे मृत्यू घातपाताने झाल्याचा इतिहास आहे. शहाबाज शरीफ पाकिस्तानचे नवे पंतप्रधान असतील. बिलावल भुत्तो परराष्ट्रमंत्री होण्याची शक्यता आहे.

बिलावल भुत्तो यांना मोठी राजकीय परंपरा आहे. बिलावल भुत्तो यांची आई बेनझीर भुत्तो आणि आजोबा झुल्फिकार अली भुत्तो यांचा तगडा इतिहास त्यांच्या पाठीशी आहे. भारताबद्दलचा द्वेष त्यांच्या रक्तातच आहे. त्यामुळे परराष्ट्रमंत्री होऊन भारताबद्दलच्या धोरणासंदर्भात त्याची भूमिका काय असेल, हे पाहणे आता उत्सुकतेचे आहे. शहाबाज शरीफ यांच्यापुढे अनेक आव्हाने आहेत. पंतप्रधानपद मिळविले असले तरी ते टिकवून ठेवणे आणि पुढच्या सार्वत्रिक निवडणुकीनंतर सत्तेवर येणे हे सर्वात मोठे आव्हान त्यांच्यासमोर आहे. शरीफ यांच्या हातात राज्यकारभारासाठी केवळ पाच महिने आहेत. पाच महिन्यांनंतर म्हणजेच ऑगस्टमध्ये सार्वत्रिक निवडणूक होणार आहे. नवे पंतप्रधान म्हणून आता त्यांना कनिष्ठ सभागृहातील १७२ मते मिळविणे हे पण दिव्य त्यांना पार करावे लागणार आहे. त्यांच्याकडे आता १७४ मते आहेत, मात्र पाकिस्तानी राजकारणाचा भरवसा कोणी देऊ शकत नाही. अविश्वास आणि सत्तेकरिता गद्दारी हा त्यांचा स्थायीभाव असल्याने १७२ जणांची मोट बांधून पंतप्रधानपद ताब्यात ठेवणे यासाठी त्यांना त्यांचे कौशल्य पणाला लावावे लागेल. पक्षपाती, सुडाचे राजकारण मोठ्या प्रमाणात होत असल्याने अविश्वासाचा ठराव इम्रान खान हरल्यावर त्यांच्या निकटवर्तीयांच्या घरावर छापे मारण्यात आले आहेत. कागदपत्र, फोन जप्त करण्यात आले आहेत.

शरीफ आता इम्रान खान हे पाकिस्तानद्रोही असल्याचा गवगवा करतील. मुळात इम्रान खान इंग्लंडमधल्या मुक्त वातावरणात वाढले आहेत. त्यामुळे पाकिस्तानच्या चौकटबंद म्हणजे बंदिस्त अशा राज्याची जबाबदारी कशी पेलतील, हा प्रश्न होता. इम्रान खान यांनाही मोठा राजकीय वारसा लाभलेला असल्यामुळे इम्रान खान पंतप्रधान होऊ शकले. परंतु ते पंतप्रधानपद त्यांना पूर्ण वेळ टिकविता आले नाही. पाकिस्तानचा राजकीय प्रवास नेहमीप्रमाणेच अडचणीचा ठरणार, यात शंका नाही. या सर्व प्रकरणात इम्रान खान यांची राजकीय कारकीर्द दीर्घ काळ चालेल हेही आता दिसत नाही. सत्ता मिळवण्याचे नापाक इरादे आता इम्रान भोगेल एवढे नक्की.

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये