पाकिस्तानी खेळाडूंना बीफ नाही तर भारतात हे खाद्य मिळणार, बीसीसीआयने अशी केली आहाराची व्यवस्था
हैदराबाद : पाकिस्तानच्या संघाचे भारतात जंगी स्वागत करण्यात आले आहे. पण पाकिस्तानच्या संघाला भारतात बीफ खायला मिळणार नाही, हे स्पष्ट आहे. पण जर पाकिस्तानला बीफ मिळणार नसेल तर त्यांचा आहार नेमका काय असेल, हे बीसीसीआयने ठरवले आहे. बीसीसीआयने यावेळी पाकिस्तानच्या संघाची खास आहार व्यवस्था केली आहे.
हैदराबाद विमानतळ आणि हॉटेलच्या बाहेर मिळालेल्या मोठ्या पाठिंब्याने पाकिस्तानी संघ आनंदी दिसत होता. मात्र या सगळ्यात कट्टर प्रतिस्पर्धी संघातील खेळाडूंमध्ये जेवणाबाबत निराशा दिसून येत होती. कारण सात वर्षांनंतर भारतात आलेल्या पाकिस्तानी संघाला भारतीय भूमीवर गोमांस दिले जात नाही. बीसीसीआयने विश्वचषकाच्या मेनूमधून बीफ गायब केले आहे, याचा अर्थ खेळाडूंना विश्वचषकादरम्यान कोणत्याही हॉटेलमध्ये बीफ मिळणार नाही.
पीटीआय या वृत्तसंस्थेनुसार भारतात सहभागी होणाऱ्या सर्व १० संघांना कोणत्याही हॉटेलमध्ये गोमांस दिले जाणार नाही. या परिस्थितीत चिकन, मटण आणि मासे यातून पाकिस्तानच्या संघाची प्रोटीनची पूर्तता होत आहे. संघाच्या आहार चार्टमध्ये ग्रील्ड लँब चॉप्स, मटन करी, अतिशय लोकप्रिय बटर चिकन आणि ग्रील्ड फिश यांचा समावेश आहे.