पालघर परिसरात ८ वर्षीय मुलावर बिबट्याचा प्राणघातक हल्ला..
पालघर : (Palghar Leapard Attack) तालुक्यातील कुडण गावात आठ वर्षांच्या मुलावर बिबट्याने हल्ला करून त्याला गंखीर जखमी केले आहे. प्रेम जितेंद्र पाटील असे बिबट्याच्या हल्ल्यात जखमी झालेल्या मुलाचे नाव आहे. दस्तुरी पाड्यात मंगळवारी (ता. २८) सकाळी साडेसात वाजण्याच्या सुमारास घराबाहेर खेळणाऱ्या मुलावर हल्ला झाला होता. त्यानंबर त्याला ताबडतोब सिल्वासा येथील विनोबा भावे सरकारी रुग्णालयात दाखल करण्यात आले. सध्या त्याच्यावर उपचार चालू आहेत.
प्रेम याच्या चेहरा आणि डोक्यावर गंभीर जखमा झाल्या आहेत. त्याची प्रकृती स्थिर असल्याचे समजते. वैद्यकीय अहवालानंतर बिबट्याने हल्ला केल्याचे स्पष्ट झाले आहे. त्याबाबद स्थानिकांनी माहिती दिली आहे. यापूर्वी बोईसर-तारापूरजवळील कुडण, दस्तुरीपाडा, पाचमार्ग, बाराहजारी परिसरात बिबट्या दिसून आला होता. मागील महिन्यात रात्री श्री स्वामी समर्थ वाडीतील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात बिबट्या कैद झाला होता.
दरम्यान, हल्ल्याची माहिती वनविभागाच्या बोईसर कर्मचाऱ्यांना मिळाल्यानंतर वनविभागाने बिबट्याचा शोध घेण्याचे काम सुरू केले आहे. वनविभागाच्या आधिकाऱ्याने परिसरातील नागरिकांशी संवाद साधून घाबरून न जाण्याचे आवाहन केले आहे. रात्री मुले आणि एकट्याने घराबाहेर न पडण्याची खबरदारी घेण्यास सांगितले आहे.