“देशासाठी पंडित नेहरूंचं नखभरही योगदान नाही, तरीही ते…”, संभाजी भिडेंचं आणखी एक वादग्रस्त वक्तव्य
यवतमाळ | Sambhaji Bhide – संभाजी भिडे (Sambhaji Bhide) यांनी महात्मा गांधी यांच्याबाबत वादग्रस्त वक्तव्य केल्यामुळे त्यांच्यावर सर्व स्तरातून टीका केली जात आहे. तसंच त्यांच्यावर कारवाई करण्याची देखील मागणी केली जात आहे. अशातच आता संभाजी भिडेंनी आणखी एक वादग्रस्त वक्तव्य केलं आहे. देशासाठी पंडित जवाहरलाल नेहरू यांचं नखाएवढंही योगदान नाही, असं वक्तव्य संभाजी भिंडे यांनी केलं आहे. ते आज श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान यवतमाळ विभागाच्या वतीनं आयोजित व्याख्यानात बोलत होते.
यावेळी संभाजी भिडे म्हणाले की, “पंडित जवाहरलाल नेहरू यांना हिंदुस्थानाप्रती कोणतंही प्रेम नव्हतं. त्यांचं देशासाठी नखभरही योगदान नसतानाही ते पंतप्रधान झाले, याचं शल्य त्यांनी व्यक्त केलं. तसंच हिंदुस्थानाला नेहरूंनी चीनसोबत केलेला पंचशील करार मारक ठरला. त्यांच्या या चुकीमुळे भारताचा चीननं पराभव केला आणि इशान्येकडील भूभाग गिळंकृत केला”, असा आरोप भिडेंनी केला.
आजपर्यंत हा भूभाग मिळवण्यासाठी कोणीच प्रयत्न केले नाहीत. सर्व लोकप्रतिनिधी देखील गप्प आहेत. तसंच हिंदुंना युद्धशास्त्राची गरज आहे. त्यासाठी अद्ययावत लष्करी शाळा काढणार असल्याचंही संभाजी भिडेंनी सांगितलं. दरम्यान, भिडेंनी पुन्हा एकदा पंडित जवाहरलाल नेहरूंबाबत वादग्रस्त वक्तव्य केल्यामुळे राज्यातील वातावरण आणखी तापण्याची शक्यता आहे.