ताज्या बातम्यापुणे

मनोज जरांगे पाटील यांची पुण्यात शांतता रॅली

अखंड मराठा समाज महाराष्ट्र राज्य, पुणे जिल्हा व सर्व मराठा सेवक यांच्या वतीने मनोज जरांगे पाटील यांची पुण्यात शांतता रॅली आयोजित केली आहे, अशी माहिती समाजाचे मराठा सेवक यांनी पत्रकार परिषदेत दिली.

ही शांतता रॅली रविवार दि ११ ऑगस्ट रोजी काढण्यात येणार आहे. रॅलीची सुरुवात सारसबाग येथील तळ्यातील गणपती मंदिरापासून सकाळी ११ वाजता होईल. बाजीराव रोड मार्गे आप्पा बळवंत चौकातुन रॅली, छत्रपती शिवाजी महाराज मिलिटरी स्कुल येथील छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्याला अभिवादन करण्यासाठी जाईल. तसेच जंगली महाराज रस्त्याने रॅली पुढे जाऊन डेक्कन येथे छत्रपती संभाजी महाराज यांच्या पुतळ्याला अभिवादन करून अलका टॉकीज चौकात मराठा समाजाला संबोधित करतील. रॅलीमध्ये साधारणत २५ लाख मराठा बांधव सहभागी होतील.

संपूर्ण पुणे जिल्ह्यातील मराठा बांधवांची चांदणी चौक येथे बैठक पार पडली. या बैठकीत सर्वानुमते मनोज जरांगे यांनी पुण्यात येऊन मराठा आरक्षणा संदर्भात जनजागृती करावी असा निर्णय झाला. त्यानुसार मराठा सेवकांनी अंतरवाली सराटी येथे जाऊन भेट घेतली आणि त्यांना विनंती केली.

मराठा समाजातील सर्व व्यावसायिक, सामाजिक संस्था, संघटना, राजकीय पक्ष यांनी स्वयंस्फूर्तीने शांतता रॅलीमध्ये सहभागी व्हावे असे आवाहन करण्यात आले आहे. मात्र कोणताही राजकीय पक्ष त्याचे नाव, चिन्ह, पद बाजूला ठेवून एक मराठा सेवक म्हणून समाजासाठी पुणे जिल्ह्यातील सर्व आजी माजी नगरसेवक आमदार, खासदार, पदाधिकारी यांनी देखील सहभागी व्हावे अशी मराठा समाजाची अपेक्षा आहे.

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये