मोत्याच्या दागिन्यांनी खुलविता येते सौंदर्य

दागिने अनेक प्रकारचे आहेत. त्यात मोत्यांच्या दागिन्यांना कायम मागणी राहत आली आहे. मोत्यांचे दागिने व्यक्तिमत्त्वात आकर्षक भर घालतात.
सध्या मार्केटमध्ये अनेक वेगवेगळे प्रकारचे दागिने ट्रेंडिंगमध्ये आहेत. यामध्ये कॉपर ज्वेलरी, ऑक्सिडाइज्ड ज्वेलरी अशा अनेक वेगवेगळ्या प्रकारच्या दागिन्यांची क्रेझ दिसत आहे. त्यात आता वेगवेगळ्या सणांना सुरूवात झाली आहे. त्यामुळे महिला नवनवीन दागिने खरेदी करताना दिसतात.
मोत्यांचे दागिने देखील आता ट्रेंडिंगमध्ये आहेत. अनेक महिलांना मोत्यांचे दागिने प्रिय असतात. कोणताही सण असो, लग्नसमारंभ असो किंवा कोणताही कार्यक्रम असो, महिला साडी किंवा ड्रेसवरती मोत्याचे दागिने आवर्जून घालतात. मोत्याचे दागिने आकर्षक दिसतात, त्याने सौंदर्य अधिक खुलून दिसते. त्यामुळे या दागिन्यांना मोठ्या प्रमाणात मागणी आहे. आता आपण याच सुंदर अशा मोत्यांच्या दागिन्यांच्या प्रकारांबाबत जाणून घेणार आहोत.
मोत्याचे हार – कोणताही कार्यक्रम असो, लग्नसोहळा असो, साडी आणि ड्रेसवरती मोत्यांचा हार खूप सुंदर दिसतो. मोत्यांचा हार तुमच्या गळ्याची शोभा अधिक वाढवण्यास मदत करतो. मोती हार कोणत्याही कार्यक्रमात घालू शकता. या हाराचे अनेक वेगवेगळे डिझाईन्स बाजारामध्ये पाहायला मिळतात. दिसायला नाजूक असलेले हे हार खूप आकर्षक दिसतात आणि ते सौंदर्यात भर घालतात. जर साडी नेसणार असाल तर त्यावर लांब मोत्याचे हार घातले, तर ते खूप उठून दिसतील.
मोत्यांची नथ – महाराष्ट्रात नथीचा तोरा काही वेगळाच आहे. त्यामुळे कोणताही कार्यक्रम असो, सण असो किंवा लग्न समारंभ असो, नथ ही आवर्जून घालताना दिसतात. त्यात मोत्यांची नथ असेल तर मग त्याची बात काही औरच. साडीवरती मोत्याची नथ ही खूप सुंदर आणि आकर्षक दिसते. नथ घातल्यानंतर सौंदर्यात भर पडते. आजकालच्या स्त्रिया तर त्यांच्या आई-आजीकडून पूर्वपरंपरागत आलेल्या नथ घालताना दिसतात. या अस्सल मोत्याच्या नथी घातल्यानंतर तुमचा लुक हटके आणि सुंदर दिसतो. त्यामुळे सध्या मोत्याच्या नथीची क्रेझ महिलांमध्ये मोठ्या प्रमाणात आहे.
मोत्याच्या बांगड्या – नऊवारी साडी आणि मोत्यांच्या बांगड्या याचं कॉम्बिनेशन एकदम झकास आहे. कोणताही कार्यक्रम असो साडी त्याचप्रमाणे ड्रेसवरती देखील मोत्यांच्या बांगड्या लक्ष वेधून घेऊ शकतात. तसेच, महाराष्ट्रीयन लग्नांमध्ये हिरव्या बांगड्यांमध्ये मोत्याच्या बांगड्या घातल्या जातात. त्यामुळे नववधूचा हात आणखीनच खुलतो आणि सुंदर दिसतो. त्यामुळे आजकाल महिलां मोत्यांच्या बांगड्यांना मोठ्या प्रमाणात पसंती दर्शविताना दिसतात. विशेष म्हणजे, मार्केटमध्ये मोत्याच्या बांगड्यांची वेगवेगळी डिझाईन्स देखील पाहायला मिळत आहेत.
मोत्यांची कर्णभूषणे – सध्या मार्केटमध्ये मोत्यांच्या कानातल्या आभूषणांची वेगवेगळी डिझाईन पाहायला मिळतात. यामध्ये मोत्याची कुडी, मोत्यांचे झुमके असे अनेक प्रकार पाहायला मिळतात. मोत्यांचे कानातले दागिने हे काठपदर साडी, ट्रॅडिशनल ड्रेस वर एकदम उठून दिसतात. आता अशा दागिन्यांमध्ये वेगवेगळ्या रंगाचे खडे देखील पाहायला मिळतात. महिलांनी मोत्यांच्या कर्णभूषणांना चांगलीच पसंती दर्शविली आहे.