ललित पाटीलसह साथीदारांच्या घराची झाडाझडती; पेनड्राईव्हसह मोबाइल जप्त
पुणे | पुण्यातील ससून रुग्णालय परिसरात ड्रग्जची तस्करी करणारा नाशिकचा ड्रग्जतस्कर ललित पाटील पोलिसांच्या डोळ्यात धूळ फेकून रुग्णालयातून सोमवारी पसार झाला होता. या प्रकरणी पुणे पोलिस आयुक्तांनी ९ पोलिसांना तडकाफडकी निलंबित केले आहे. याप्रकरणी आता नवीन माहिती समोर आली आहे.
ललित पाटील याच्यासह त्याचा भाऊ आणि अन्य आरोपींच्या नाशिक येथील घरांची पुणे पोलिसांनी झडती घेतली. तेथून पेनड्राइव्ह आणि मोबाइल जप्त करण्यात आले असून, त्यातील डेटाचे विश्लेषण करण्यात येत आहे, अशी माहिती पोलिसांकडून सोमवारी न्यायालयात देण्यात आली.
या गुन्ह्यात सुभाष मंडल (वय 29) आणि ससून रुग्णालयाच्या कँटिनचा कर्मचारी रौफ रहीम शेख (वय 19) यांना अटक करण्यात आली आहे. ललित पाटीलला पुण्याबाहेर जाण्यासाठी ‘लिफ्ट’ देणारा कारचालक दत्ता डोकेलाही अटक करण्यात आली आहे. पाटीलचा भाऊ भूषण सुभाष पाटील आणि अभिषेक विलास बलकवडे यांचाही आरोपी म्हणून समावेश करण्यात आला आहे, अशी माहिती पुणे पोलिसांनी न्यायालयात दिली.
‘ससून’मध्ये दाखल असताना शहर पोलिसांनी ललित पाटीलकडील दोन मोबाइल जप्त केले होते. त्या मोबाइलचे पासवर्ड पोलिसांना सांगण्यास पाटीलने नकार दिला होता. त्यामुळे मोबाइल ‘अनलॉक’ करण्यासाठी तज्ज्ञांच्या मदतीने प्रयत्न करण्यात आले. मात्र, त्याला यश आले नाही. पासवर्डसाठी मोबाइल तयार करणाऱ्या कंपनीशीही देखील संपर्क साधण्यात आल्याचे पोलिसांनी न्यायालयात दाखल केलेल्या रिमांडमध्ये म्हटले आहे.