दिव्यांगांनी सादर केले सांकेतिक भाषेत राष्ट्रगीत

पुणे : मानवी संवेदना समजण्यासाठी भाषा हा फार महत्त्वाचा भाग आहे. संवादाच्या माध्यमातून एकमेकांची मने जोडली जातात. दिव्यांगांना सामाजिक प्रवाहात आणण्यासाठी सांकेतिक भाषेला प्रोत्साहन देणे महत्वपूर्ण आहे. सांकेतिक भाषा समाजामध्ये प्रभावीपणे रुजणे गरजेचे आहे. शेतकऱ्यांच्या दिव्यांग मुलांना त्यांच्या पायावर उभं राहता यावं आणि त्यांना समाजात स्थान मिळावं या उदात्त हेतूने डॉ. सोनम कापसे यांनी सुरु केलेले हॉटेल निश्चितच प्रेरणादायी आहे. दिव्यांग मुलांकडे पाहण्याचा दृष्टीकोन समाजाने बदलला पाहिजे. संवेदनशील माणसांनी या मुलांच्या भविष्यासाठी प्रयत्न करायला हवेत असे मत साखर आयुक्त शेखर गायकवाड यांनी व्यक्त केले.
फर्ग्युसन कॉलेज रोडवरील पूर्णपणे दिव्यांग मुलांकडून चालवलं जाणा-या टेरासीन रेस्टॉरंटमध्ये जागतिक सांकेतिक भाषादिन साजरा करण्यात आला. यावेळी विशेष मुलांनी सांकेतिक भाषेत राष्ट्रगीत सादर केले व सांकेतिक भाषेतील मुलभूत प्रात्याक्षिके दाखविली. दिव्यांगांना सुरक्षित भविष्य देण्यासाठी तसेच सहानुभूतीद्वारे नव्हे तर सन्मानाचे व्यासपीठ म्हणून सुरु झालेल्या या रेस्टॉरच्या कार्यक्रमावेळी गायकवाड बोलत होते.
यावेळी बालभारतीचे संपादक किरण केंद्रे, प्रसिद्ध उद्योजक कल्याण तावरे, डॉ. सोनम कापसे, वंदना गायकवाड, शैलेश केदारे उपस्थित होते. शेखर गायकवाड म्हणाले, भारतात सर्व जिल्ह्यात अशी मुले आहेत, सर्वांना बरोबर घेऊन जाणारा विकास झाला पाहिजे. नवीन पिढी समाजात चांगले बदल आणत आहे, समाज देखील तो बदल स्विकारत आहे. त्यामधील एक उदाहरण म्हणजे टेरासीन हा प्रकल्प आहे. मागील अनेक वर्षे विशेष मुलांना संभाळणे आणि जगवणे हाच उद्देश ठेवून वाटचाल झाली आहे. परंतु, त्यांना स्वतःच्या पायावर उभा करणे, इतर सर्वसामान्य माणसाप्रमाणे जगण्यास संधी देणे हे दैवी काम आहे. असा प्रयोग विशेष मुलांना स्वतःच्या पायावर उभा करून स्वाभिमान देणारा आहे.