ताज्या बातम्यापिंपरी चिंचवड

पिंपरी चिंचवड पोलीस भरतीसाठी लेखी परीक्षा सुरळीत

पिंपरी-चिंचवड शहर पोलीस दलाच्या आस्थापनेवरील २६२ पोलीस शिपाई पदांसाठी पोलीस भरती सुरु आहे. भरतीची लेखी परीक्षा शनिवारी (दि. १०) सकाळी दहा वाजता ताथवडे पुणे येथील श्री बालाजी विद्यापीठ येथे पार पडली. २६२ जागांसाठी २९८९ उमेदवारांना बोलवण्यात आले. त्यातील २८२८ उमेदवार लेखी परीक्षेसाठी हजर राहिले.

पिंपरी-चिंचवड शहर पोलीस दलात २६२ पदे भरली जाणार आहेत. त्यामध्ये सर्वसाधारण उमेदवारांसाठी ७९ पदे, महिला ७८ पदे, खेळाडू १५ पदे, प्रकल्पग्रस्त १४ पदे, भूकंपग्रस्त ४ पदे, माजी सैनिक ४१ पदे, अंशकालीन पदवीधर ११ पदे, पोलीस पाल्य ७ पदे, गृहरक्षक दल १३ पदे, अनाथ ३ पदे राखीव आहेत.

पोलीस भरतीची लेखी परीक्षा शनिवारी सुरळीत पार पडली. लेखी परीक्षे दरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडू नये, परीक्षा सुरक्षित वातावरणात पार पडावी यासाठी पिंपरी चिंचवड पोलिसांनी चोख नियोजन केले. परीक्षा केंद्रावर योग्य बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. कोणताही अनुचित प्रकार घडणार नाही याबाबत वरिष्ठ लक्ष ठेवून होते.

लेखी परीक्षेसाठी राज्याच्या विविध भागातून उमेदवार पिंपरी चिंचवड शहरात आले होते. काही उमेदवार शुक्रवारी रात्री परीक्षा केंद्रावर आले. या उमेदवारांची गैरसोय होऊ नये म्हणून पिंपरी चिंचवड पोलिसांनी त्यांची पोदार इंटरनॅशनल स्कूल येथे महिला आणि पुरुष उमेदवारांची स्वतंत्र राहण्याची व्यवस्था केली. शनिवारी सकाळी या उमेदवारांना चहा-नाश्ता देखील देण्यात आला. शुक्रवारी रात्री सुमारे ३५० उमेदवार मुक्कामी होते.

लेखी परीक्षेसाठी चार पोलीस उपायुक्त, नऊ सहाय्यक पोलीस आयुक्त, 31 पोलीस निरीक्षक, १३३ सहाय्यक पोलीस निरीक्षक/पोलीस उपनिरीक्षक, ४४४ पोलीस अंमलदार आणि २० वार्डन असा बंदोबस्त लावण्यात आला. पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे हे भरती प्रक्रियेचे दक्षता अधिकारी आहेत. अपर पोलीस आयुक्त वसंत परदेशी हे प्रभारी अधिकारी तर पोलीस उपायुक्त (मुख्यालय) माधुरी कांगणे-केदार या समन्वय अधिकारी आहेत.

१२ हजार उमेदवार मैदानी मधूनच बाहेर

पिंपरी-चिंचवड पोलीस दल परीक्षेसाठी राज्यभरातून १५ हजार ४२ अर्ज आले. त्यामध्ये वकील, डॉक्टर, इंजिनिअर यासह पदव्युत्तर पदवी धारकांचा देखील समावेश होता. दोन तृतीयपंथी उमेदवारांनी देखील अर्ज केला. मात्र मैदानी चाचणी मध्ये उत्तीर्ण होऊन लेखीसाठी अवघे दोन हजर ९८९ उमेदवार पात्र ठरले.

१६१ उमेदवार लेखीसाठी गैरहजर

पिंपरी चिंचवड शहर पोलीस दलात पोलीस शिपाई पदांची भरती सुरू आहे. या भरतीसाठी १५ हजार ४२ उमेदवारांनी अर्ज केले. त्यातील १२ हजार उमेदवार मैदानी चाचणीत अपयशी ठरले. तर उर्वरित २९८९ उमेदवारांना लेखीसाठी बोलवण्यात आले. लेखी परीक्षेसाठी १६१ उमेदवार गैरहजर राहिले. तर २८२८ उमेदवारांनी लेखी परीक्षा दिली.

Related Articles

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये