फ्लॉप ठरलेल्या ‘द व्हॅक्सिन वॉर’ चित्रपटाचं पीएम मोदींकडून कौतुक!
PM Modi On The Vaccine War | विवेक अग्निहोत्री (Vivek Agnihotri) दिग्दर्शित ‘द व्हॅक्सिन वॉर’ (The Vaccine War) हा चित्रपट 28 सप्टेंबर रोजी सर्वत्र प्रदर्शित झाला. या चित्रपटामधून भारतीय शस्त्रज्ञांनी तयार केलेल्या कोरोना व्हॅक्सिनची गोष्ट दाखवण्यात आली आहे. हा चित्रपट सुपरहिट होईल असं वाटलं होतं मात्र प्रेक्षकांनी या चित्रपटाकडे पाठ फिरवलेली पाहायला मिळाली. अशातच देशाचे पंतप्रधान मोदी (Narendra Modi) यांनी ‘द वॅक्सीन वॉर’ या चित्रपटाचे कौतुक केले आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची आज राजस्थानच्या जोधपूरमध्ये सभा झाली. या सभेवेळी राजस्थानमधील जनतेशी संवाद साधताना पीएम मोदींनी ‘द व्हॅक्सिन वॉर’ या चित्रपटाचे आणि निर्मात्यांचे कौतुक केले आहे. यावेळी पीएम मोदी म्हणाले की, ‘मी ऐकले आहे की एक चित्रपट आला आहे. ‘द व्हॅक्सिन वॉर’. भारतात कोविडशी लढण्यासाठी आपल्या देशातील वैज्ञानिकांनी रात्रं-दिवस मेहनत घेतली. प्रयोगशाळेत ऋषीसारखं ध्यान केले. महिला वैज्ञानिकांनी देखील अद्भूत काम केलं. या सर्व गोष्टींना अतिशय छान पद्धतीने या चित्रपटात दाखवण्यात आले आहे.’ आपल्या देशातून चांद्रयान जाते, व्हॅक्सीन तयार होते तेव्हा वैज्ञानिकांसह सर्वांना अभिमान वाटतो. हा चित्रपट तयार करून शास्त्रज्ञ आणि विज्ञानाला महत्त्व दिल्याबद्दल मी या चित्रपटाच्या निर्मात्यांचे अभिनंदन करतो.’, असे देखील मोदींनी यावेळी सांगितले.