महाराष्ट्रातील तरूणांना मिळणार रोजगाराच्या संधी?, पंतप्रधान मोदींनी केली ‘ही’ मोठी घोषणा
मुंबई | PM Narendra Modi – महाराष्ट्रातील तरूणांना दिलासा देणारी माहिती समोर आली आहे. राज्यातील तरूणांना लवकरच रोजगाराच्या संधी उपलब्ध होणार आहेत. महाराष्ट्रात 2 लाख कोटींचे 225 प्रकल्प मंजूर करण्यात आले असल्याची माहिती पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी दिली आहे. मुंबईत रोजगार मेळावा आयोजित करण्यात आला आहे. या मेळाव्यात नियुक्तीपत्रांचं वाटप करण्यात आलं. यावेळी नरेंद्र मोदींनी संवाद साधत महाराष्ट्रात भविष्यात तरूणांसाठी रोजगाराच्या अधिक संधी उपलब्ध होतील, असा विश्वास व्यक्त केला आहे.
“स्टार्टअप, लघु उद्योगांना संभाव्य आर्थिक मदत सरकार देत आहे. जेणेकरून तरूणांना आपलं कौशल्य दाखवण्याची संधी मिळेल. सरकारच्या प्रयत्नांमधून रोजगाराच्या संधी दलित, आदिवासी महिलांना समान स्वरूपात उपलब्ध होत आहेत”, अशी माहिती नरेंद्र मोदींनी दिली. तसंच गेल्या आठ वर्षात 8 कोटी महिला सेल्फ हेल्प ग्रुपशी जोडल्या गेल्या आहेत. त्यांना साडे पाच लाख कोटींची मदत देण्यात आली आहे. या ग्रुपशी जोडलेल्या महिला इतर महिलांनाही रोजगार देत आहेत,” असंही मोदींनी सांगितलं.
“आज देशभरात पायाभूत सुविधा, माहिती-तंत्रज्ञान आणि इतर क्षेत्रांमध्ये सरकार मोठ्या प्रमाणात गुंतवणूक करत आहे. यामुळे रोजगाराच्या नव्या संधी निर्माण होत आहेत. महाराष्ट्रात 2 लाख कोटींपेक्षा जास्त 225 प्रकल्प मंजूर करण्यात आले आहेत. या प्रकल्पांवर काम सुरु आहे किंवा सुरु होत आहे. महाराष्ट्रात रेल्वेसाठी 75 हजार कोटी आणि रस्ते विकास प्रकल्पासाठी 50 हजार कोटींचा निधी देण्यात आला आहे,” अशी माहिती देखील मोदींनी दिली.
“केंद्र सरकार पायाभूत सुविधांवर खर्च करत असताना त्यातून रोजगाराच्या लाखो संधी निर्माण होतात. भविष्यात महाराष्ट्रात तरुणांसाठी रोजगाराच्या अधिक संधी उपलब्ध होतील,” असा विश्वासही पंतप्रधान मोदींनी व्यक्त केला.