देशसेवेत कसूर ठेवणार नाही; मोदी यांची देशवासीयांना ग्वाही
पुणे | PM Narendra Modi – देशसेवा करण्यात यापुढेही कधी कसूर ठेवणार नाही, अशी ग्वाही पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी लोकमान्य टिळक पुरस्कार स्वीकारताना देशवासीयांना मंगळवारी दिली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना हिंद स्वराज्य संघाचा लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कार समारंभपूर्वक प्रदान करण्यात आला. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेल्या ओजस्वी भाषणाला पुणेकरांनी उत्स्फूर्त दाद दिली.
पुणेकरांचा प्रतिसाद पाहून मोदी भावुक झाले होते. हा पुरस्कार हिंद स्वराज्य संघाचे अध्यक्ष डॉ.दीपक टिळक यांच्या हस्ते पंतप्रधान मोदी यांना प्रदान करण्यात आला. पुणेरी पगडी, मानपत्र, स्मृतिचिन्ह आणि रोख एक लाख रुपये असे पुरस्काराचे स्वरूप आहे. याप्रसंगी व्यासपीठावर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सुशीलकुमार शिंदे, राज्यपाल रमेश बैस, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार उपस्थित होते.
पंतप्रधान मोदी यांनी भाषणाच्या सुरुवातीला लोकमान्य टिळक आणि लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांचे स्मरण करून अभिवादन केले. त्यांच्या देशसेवेचा, समाजसेवेचा पंतप्रधानांनी गौरव केला. टिळक पुरस्काराच्या निमित्ताने मिळालेले एक लाख रुपये पंतप्रधानांनी नमामि गंगे प्रकल्पासाठी सुपूर्द करणार असल्याची घोषणा केली. त्यांच्या या घोषणेला उपस्थितांनी टाळ्या वाजवून दाद दिली.
यावेळी बोलताना मोदी म्हणाले काशी आणि पुणे यामध्ये समन्वय आहे. काशी आणि पुणे ही दोन विद्वत्तेनी संपन्न अशी शहरे आहेत. या विद्वानांच्या शहरात टिळकांच्या नावाने मला पुरस्कार मिळणं, हे माझे भाग्य आहे. टिळकांच्या नावाचा पुरस्कार स्वीकारताना माझी जबाबदारी तर वाढलीच आहे, पण मी भावूकही झालो आहे, अशी भावना मोदी यांनी व्यक्त केली.
लोकमान्य टिळक, सरदार वल्लभभाई पटेल, वीर सावरकर यांच्या विषयीची माहिती मोदी यांनी भाषणात दिली. गुजरातच्या जनतेचे आणि लोकमान्यांचे एक विशेष नाते आहे. स्वातंत्र्य लढ्यात टिळक दीड महिना आमदाबादच्या साबरमती तुरुंगात कैदेत होते. १९१६ साली लोकमान्य आमदाबादला आले होते. त्यावेळी ४० हजारांहून अधिक लोकांनी त्यांचे स्वागत केले. त्या स्वागताला सरदार वल्लभभाई पटेल उपस्थित होते. टिळकांच्या व्यक्तिमत्त्वाने ते प्रभावित झाले. त्यानंतर काही वर्षात वल्लभभाई पटेल आमदाबाद नगरपालिकेचे अध्यक्ष झाले. आमदाबाद इथल्या व्हिक्टोरिया गार्डनमध्ये लोकमान्य टिळक यांचा पुतळा उभारण्याचा निर्णय त्यांनी घेतला. ब्रिटिश महाराणीच्या नावाने बनविलेल्या या उद्यानात टिळक यांचा पुतळा उभारण्याचा निर्णय क्रांतीकारक होता. या निर्णयापासून पटेल यांना रोखण्याचा प्रयत्न झाला. पण, सरदार हे सरदारच होते. पदाचा राजीनामा देईन पण, पुतळा तिथेच बसविला जाईल, अशी घोषणा वल्लभभाईंनी केली. १९२९ साली महात्मा गांधी यांच्या हस्ते पुतळ्याचे लोकार्पण करण्यात आले.
लोकमान्य टिळक यांनी ध्येयासक्त तरूणांना तयार केले. सावरकर यांच्यातील गुणवत्ता ओळखून त्यांना बॅरिस्टर चे शिक्षण घेण्यासाठी प्रोत्साहन दिले. लंडनमध्ये शिकून सावरकरांनी भारतात येवून देशसेवा करावी, अशी लोकमान्यांची इच्छा होती. ब्रिटनमधील शामजी कृष्ण वर्मा यांच्याकडे शिष्यवृत्तीसाठी सावरकर यांच्या नावाची शिफारस टिळकांनी केली. गुणग्राहकता ओळखण्याची त्यांची वृत्ती या घटनेतून दिसून येते, असे पंतप्रधान मोदी यांनी सांगितले. कार्यक्रमाच्या प्रारंभी दीपक टिळक यांनी प्रास्ताविक केले. उपस्थितांकडून मोदी, मोदी आणि जय श्रीराम अशा घोषणा देण्यात येत होत्या.