अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमवर विषप्रयोग; रूग्णालयात उपचार सुरू
Dawood Ibrahim | अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमबाबत (Dawood Ibrahim) एक खळबळजनक माहिती समोर आली आहे. दाऊदवर विषप्रयोग केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. विषप्रयोगानंतर त्याला पाकिस्तानच्या कराची येथील रूग्णालयात दाखल करण्यात आलं. याबाबतचं वृत्त ‘इंडिया टुडे’नं दिलं आहे. मात्र, अद्याप या माहितीबाबत कोणतीही अधिकृत पुष्टी करण्यात आलेली नाहीये.
मिळालेल्या माहितीनुसार, दाऊद इब्राहिमवर गेल्या दोन दिवसांपासून कराची येथील रूग्णालयात उपचार सुरू आहेत. तसंच रूग्णालयात संबंधित मजल्यावर तो एकमेव रूग्ण असून रूग्णालयात कडेकोट बंदोबस्त करण्यात आला आहे. तर रूग्णालयात डॉक्टर आणि दाऊदच्या कुटुंबातील सदस्यांना प्रवेश दिला जात आहे.
दुसरीकडे, पाकिस्तानातील इंटरनेट सेवा बंद करण्यात आल्या आहेत. कोणतीही माहिती प्रसारीत होऊ नये म्हणून इंटरनेट सेवा बंद करण्यात आल्याचं म्हटलं जात आहे. मात्र, याबाबत पाकिस्तानी समाज माध्यमांवर जोरदार चर्चा होत आहे.
दरम्यान, दाऊदला रूग्णालयात दाखल केल्याच्या वृत्तानंतर मुंबई पोलीस दाऊदच्या नातेवाईकांकडून अधिक माहिती मिळवण्याचा प्रयत्न करत आहेत.