Gautami Patil: गौतमीला मोठा धक्का; सोलापुरातील कार्यक्रमाला पोलिसांनी परवानगी नाकारली, नेमकं कारण काय?
Gautami Patil | सध्या नृत्यांगना गौतमी पाटील (Gautami Patil) ही चांगलीच चर्चेत आहे. तिचा चाहता वर्गही लाखोंच्या संख्येत आहे. गौतमीचे कार्यक्रम पाहण्यासाठी तरूणाई मोठ्या प्रमाणात गर्दी करताना दिसते. पण गेल्या काही दिवसांपासून गौतमीच्या कार्यक्रमांना परवानगी मिळत नसल्याचं चित्र दिसतंय. काही दिवसांपूर्वीच कोल्हापुरात (Kolhapur) गौतमीचा कार्यक्रम होणार होता. पण पोलिसांनी तिच्या कार्यक्रमाला परवानगी नाकारली होती. तर आता सोलापुरातही (Solapur) तिच्या कार्यक्रमाला पोलिसांनी परवानगी नाकारली आहे.
सोलापुरात गौतमीचा कार्यक्रम होणार होता. तेथील एका स्थानिक डिजिटल वृत्तवाहिनीच्यावतीनं ‘डिस्को दांडिया’ हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. तर या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून गौतमीला बोलावण्यात आलं होतं. पण आता या कार्यक्रमाला पोलिसांनी परवानगी नाकारली आहे. कायदा आणि सुव्यवस्थेचं कारण सांगत पोलिसांनी कार्यक्रमाला परवानगी नाकारली आहे.
नवरात्र काळात पोलिसांकडील मनुष्यबळ बंदोबस्तासाठी मोठ्या प्रमाणात वापरले जाते. त्यामुळे गौतमीच्या कार्यक्रमात पोलीस बंदोबस्त देणं शक्य नसल्यानं पोलिसांनी गौतमीच्या कार्यक्रमाला परवानगी नाकारली असल्याचं म्हटलं जातंय.