
संप करून कर्मचार्यांच्या पदरात फायदा मिळवून देणं, हा भाजपनेत्यांचा आणि खुद्द सदावर्ते यांचा प्रामाणिक हेतू असता, तर संप केव्हाच मिटला असता. पण या संपाआडून त्यांना राजकारण करायचं होतं. शरद पवारांच्या घरावर एस.टी. संपकर्यांचा मोर्चा पोहोचणे आणि तिथे दगडफेक, चप्पलफेक होणे हा त्या षड्यंत्राचाच एक भाग आहे.
गेल्या पाच महिन्यांपासून एसटी कर्मचारी एसटी महामंडळाचे विलीनीकरण करण्यात यावे, या मागणीसाठी संपावर आहेत. उच्च न्यायालयाने आता विलीनीकरण हा सरकारचा धोरणात्मक निर्णय असून सद्यःस्थितीत शक्य नाही असे म्हटले. विलीनीकरणाला नकार दिला असतानाही आझाद मैदानात जल्लोष साजरा करण्यात आला, तर दुसर्या दिवशी १० एप्रिल रोजी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष आणि महाविकास आघाडीचे कर्ता-करविता शरद पवार यांच्या घरावर परवा एसटी कर्मचार्यांनी केलेला हल्ला म्हणजे भाजपने अॅड. गुणरत्न सदावर्ते यांच्या मागे लपून सरकार पाडण्यासाठी केलेलं षड्यंत्र दिसत आहे. सदावर्ते एकीकडे ज्येष्ठ नेते शरद पवार, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, परिवहनमंत्री अनिल परब यांचा एकेरी उल्लेख करीत होते, तर दुसरीकडे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना साहेब म्हणत होते, त्यावरूनच त्यांची विचारधारा स्पष्ट होते.
सर्वसामान्य शेतकरी, शेतमजूर, विद्यार्थी – विद्यार्थिनी, ग्रामीण महिला अशा अनेकांना त्यांच्या इच्छित स्थळी पोहोचविण्यासाठी एसटीने संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आपले वाहतुकीचे जाळे पसरले आहे. तब्बल ६०९ बसस्थानकांच्या माध्यमातून सुमारे १६ हजार बसेसद्वारे दररोज ६६ लाख प्रवाशांची सुरक्षित ने-आण करण्याची जबाबदारी एसटीवर गेली अनेक वर्षे आहे आणि गेली कित्येक वर्षे हे कार्य एसटी अगदी इमाने-इतबारे पार पाडत आली आहे, म्हणूनच तिला महाराष्ट्राची “लोकवाहिनी” असेदेखील म्हटले जाते. पण महाराष्ट्राच्या सर्वांगीण विकासामध्ये एसटीचे मोठे योगदान असून आज एसटी महामंडळ प्रचंड आर्थिक अडचणीत सापडले आहे. त्यातच कोरोनामुळे आणखी बिकट परिस्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे यापुढे पूर्वीसारखे २१ कोटी रुपयांचे उत्पन्न मिळणे अशक्य आहे. कर्मचार्यांना वेतन वेळेवर मिळत नसल्याने वेतन कमी असल्याने त्यांनी लढा सुरू केला आहे. पण या कर्मचार्यांच्या संपातील महागाई भत्ता, घरभाडे भत्ता या मागण्या २८ ऑक्टोबरलाच मान्य झाल्या आहेत, तर नोव्हेंबरमध्ये वेतनवाढही देण्यात आली. मात्र सदावर्ते यांच्यासारख्या वकिलाला एसटी महामंडळाची आर्थिक स्थिती माहिती होती. एसटी कर्मचार्यांना जाणीवपूर्वक चिथावण्याचे काम सदावर्ते यांनी केले. त्यामुळे एसटी कर्मचार्यांच्या आत्महत्येचा आकडा ऑक्टोबरमध्ये २८ होता. एप्रिलमध्ये १२८ पर्यंत पोहोचला आहे. त्याला जबाबदार कोण आहे?

लोकशाहीत आंदोलन करण्याचा अधिकार आहे, पण त्यालाही मर्यादा आहेत. गोपीचंद पडळकर आणि सदाभाऊ खोत या भाजपच्या म्होरक्यांनी या संपाला काडी लावली आणि त्यात गुणरत्न सदावर्ते यांनी त्यात तेल ओतले. आपली मागणी मान्य होऊ शकत नाही, हे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी ते मुख्यमंत्री असताना जाहीररीत्या सांगूनही हे दोन नेते विलीनीकरणाची मागणी कोणत्या आधारे करीत होते. आपल्या मागण्या पदरात पाडण्यासाठी आंदोलनं केली जातात. पण इतक्या टोकापर्यंत ती पोहोचवली जात नसतात, हे गणित सदावर्ते यांना ठाऊक नाही असे नाही. यानिमित्ताने ते राज्यातल्या सरकारला धडा शिकवायचा प्रयत्न करीत होते, असेच चित्र होते. आझाद मैदानात सुरू असलेल्या संपावेळी सुरुवातीला भाजपचे नेते काहीबाही बोलत होते. त्यांनी कामगारांना दिलेल्या चिथावणीनंतरही या नेत्यांवर काहीच कारवाई झाली नाही. यामुळे बोट चेपलेेल्या गुणरत्न सदावर्ते यांच्या जिभेला हाड राहिलं नाही. ते हवं तसं बडबडत गेले. समोरच्या कामगारांना तेच हवं होतं. ते टाळ्या पिटायचे आणि सदावर्ते सुटल्यासारखं बोलायचे. तेच शब्द एसटी कर्मचार्यांच्या तोंडात होते. राज्यात महाविकास आघाडीच्या सरकारला नेस्तनाबूत करण्यासाठी भाजपच्या खांद्याला सदावर्ते यांनी कायम खांदा दिला. सरकारच्या बदनामीसाठी भाजपने काय केलं नाही? २०१४ च्या पाच वर्षांच्या सत्तेनंतर या राज्यावर आपलाच मक्ता आहे, असे त्यांना वाटू लागलं. पण सत्ता काही मिळाली नाही. गोवा, कर्नाटक, मध्य प्रदेश ही राज्ये हाती येऊनही देशात समृद्ध असलेला महाराष्ट्र आपल्याला मिळत नाही, याची सल या पक्षाच्या नेत्यांना सातत्याने बोचत होती. यातून एकेका घटकाला चिथावणी देण्याचे उद्योग येनकेन प्रकारेन केले जात होते आणि आहेत. एसटी संप याच पठडीत बसणारा होता.

कोणत्याही मोर्चाला पोलिस खात्याची परवानगी लागते. आझाद मैदानापासून पेडर रोडवरील सिल्व्हर ओक या पवारांच्या निवासस्थानापर्यंत सुमारे शंभर माणसांचा हा जमाव कसा पोहोचू शकला, हा एक प्रश्नच आहे. पण हा मोर्चा होता की हुल्लडबाजांचा एक गट होता. अॅड. गुणरत्न सदावर्ते या एसटी संपकर्यांच्या स्वयंघोषित नेत्याने भाजपच्या छुप्या पाठिंब्याने घडवून आणलेला हा तमाशा, असा आरोप केला जात आहे आणि त्यात तथ्यही आहे. महाराष्ट्रात हातातोंडाशी आलेला सत्तेचा घास तीन पक्षांच्या महाविकास आघाडीमुळे हिरावला गेल्यानंतर भाजपचा जळफळाट जास्त वाढला आहे आणि जसा अण्णा हजारेंना समोर करून केंद्र सरकारविरुद्ध एक आंदोलन उभं केलं गेलं, तसाच हा प्रकार दिसत आहे. एसटीचं राज्य सरकारमध्ये विलीनीकरण केवळ अशक्य याची कल्पना राज्याचे माजी अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्यासह सर्वांना आहे. म्हणूनच गोपीचंद पडळकर, सदाभाऊ खोत या आपल्याच माणसांच्यानंतर भाजपने एसटी कर्मचार्यांच्या संपात उतरवलं ते सरळ गुणरत्न सदावर्तेंना. त्यांना भाजपचा शिक्का न लावता सर्व रसद पुरवून! एसटी कर्मचार्यांनी शुक्रवारी थेट राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या निवासस्थानी आंदोलन केलं.

काही आंदोलकांनी निवासस्थानाच्या दिशेने चपलादेखील भिरकावल्या. या पार्श्वभूमीवर एसटी कर्मचार्यांचे वकील गुणरत्न सदावर्ते यांना ११ एप्रिलपर्यंत पोलिस कोठडी व १०९ आंदोलक कर्मचार्यांना न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली होती. एसटी कर्मचार्यांनी सिल्व्हर ओकवर केलेल्या आंदोलनामागे इतर काही शक्ती असल्याची रास्त शंका तिनही सत्ताधारी राजकीय पक्षांनी व्यक्त केली. माध्यमांना असं काही होणार असल्याची माहिती मिळते, तिथे पोलिसांना का मिळत नाही? असा सवाल पोलिस यंत्रणेचं अपयश दाखवून देत आहे. या षड्यंत्रास जबाबदार असणार्यांना योग्य ती शिक्षा होईलही; पण संप चिघळल्याने आज कित्येकांचे संसार उघड्यावर पडले आहेत, लालपरीला कोट्यवधींचा फटका बसला, एसटीअभावी वयोवृद्ध, विद्यार्थी यांना पायपीट करावी लागली.