अपंगत्व प्रमाणपत्रासाठी पुजा खेडकर यांनी सादर केला तळवडेचा खोटा पत्ता
आयएएस ही पोस्ट मिळवण्यासाठी पुजा खेडकर यांनी केलेले कारनामे आता हळू हळू बाहेर येत असून त्यांनी खोटा पत्ता व बनावट रेशन कार्ड देऊन अपंगत्व प्रमाणपत्र मिळवले आहे. त्यांनी सादर केलेल्या पत्त्यावर मात्र घराचा पत्ता नसल्याचे समोर आले आहे. पूजा खेडकर यांनी यशवंतराव चव्हाण मेमोरिअल हॉस्पिटलमध्ये प्लॉट नंबर ५३ देहू आळंदी, तळवडे हा पत्ता सादर केला असून पिंपरी चिंचवडमधील त्यांचे निवासस्थान असल्याचा दावा त्यांनी केला. मात्र या पत्त्यावर निवासी मालमत्ता नसून थर्मोवेरिटा इंजिनिअरिंग प्रायव्हेट लिमिटेड कंपनी आहे. ही कंपनी आता बंद झाली आहे, असे वृत्त इंडिया टुडे ने दिलं आहे.
याबाबत बनावट अपंगत्व प्रमाणपत्राच्या आधारे त्यांनी सरकारी नोकरी बळकावल्यानंतर आता आणखी एक धक्कादायक बाब समोर आली आहे. पूजा खेडकर यांनी खोटा पत्ता आणि बनावट रेशन कार्ड वापरून अपंगत्व प्रमाणपत्र मिळवलं होतं, कंपनीच्या पत्त्याचा वापर करून बनावट रेशनकार्ड तयार करण्यात आल्याचे कागदपत्रांवरून स्पष्ट होत आहे. याच पत्त्याचा वापर करून पूजा खेडकर यांनी लोकोमोटर अपंगत्वाचे प्रमाणपत्र मिळवलं आहे. २४ ऑगस्ट २०२४ रोजी जारी करण्यात आलेल्या प्रमाणपत्रात त्यांना गुडघ्यात सात टक्के अपंगत्व असल्याचे नमूद करण्यात आलं होतं.
केवळ बनावट अपंगत्व प्रमाणपत्रच नव्हे तर थर्मोवेरिटा कंपनीच्या नावावर ऑडी कारचीही नोंदणी करण्यात आली आहे. पिंपरी-चिंचवड पालिकेच्या कर संकलन विभागानुसार या कंपनीवर गेल्या तीन वर्षांपासून २.७ लाख रुपये थकीत आहेत.