पुणे

पुण्यात दोन रुग्णांना झिका विषाणू संसर्गाचे मरणोत्तर निदान

पुण्यात खासगी रुग्णालयात मरण पावलेल्या दोन रुग्णांना झिका विषाणूचा संसर्ग झाला होता, असे चाचणीत निष्पन्न झाले आहे.

दोन रुग्णांना झिका विषाणूचा संसर्ग झाल्याचे त्यांच्या मृत्यूनंतर निदान झाल्यामुळे पुणे महापालिकेच्या प्रभारी आरोग्य प्रमुख डॉ कल्पना बळवंत यांनी नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ व्हायरोलॉजी च्या संचालकांना पत्र लिहून प्रकरणांबद्दल मार्गदर्शन करण्याची विनंती केली आहे.

शहरातील ७२ ते ७६ वयोगटातील दोन रुग्ण जुलै महिन्याच्या सुरुवातीला मरण पावले. त्यानंतर झिका विषाणू संसर्गाबाबत केलेल्या चाचणीचे निदान सकारात्मक आले.

वारजे येथील मृताला १० जुलै रोजी जोशी रुग्णालयात दाखल करण्यात आले आणि १४ जुलै रोजी त्याचा मृत्यू झाला. त्याचे नमुने १८ जुलै रोजी एनआयव्हीकडे पाठविण्यात आले आणि दुसऱ्या दिवशी आलेल्या अहवालात झिका विषाणूची लागण झाल्याची पुष्टी झाली.

खराडी येथील दुसऱ्या मृत व्यक्तीला १८ जुलै रोजी शास्त्रीनगर येथील सह्याद्री रुग्णालयात दाखल करण्यात आले आणि २१ जुलै रोजी त्याचा मृत्यू झाला. त्याचे नमुने २२ जुलै रोजी एनआयव्ही, पुणे येथे पाठविण्यात आले आणि २३ जुलै रोजी झिका विषाणूची लागण झाल्याची पुष्टी अहवालात करण्यात आली.

दरम्यान, प्रभात रोड येथील रहिवासी असलेल्या ७२ वर्षीय महिलेची शुक्रवारी झिका विषाणूची चाचणी पॉझिटिव्ह आल्याने शहरातील एकूण रुग्णांची संख्या ३७ वर पोहोचली आहे. या महिलेने १५ जुलैपासून ताप आणि सूज यांसारख्या लक्षणांची तक्रार केली होती. तिचे नमुने एनआयव्हीकडे पाठवण्यात आले आणि चाचणी अहवालात व्हायरसच्या संसर्गाची पुष्टी झाली.

झिकाचा संसर्ग आढळून आलेल्या भागात बारीक लक्ष ठेवण्यात येत असून प्रतिबंधात्मक उपाययोजना सुरू करण्यात आल्या आहेत, असे डॉ. बळवंत म्हणाल्या.

पुणे महापालिकेने संशयित 38 गर्भवती महिलांचे नमुने एनआयव्हीकडे तपासणीसाठी पाठवले आहेत. त्यापैकी 12 नमुने घोले रोड येथील, नऊ नमुने खराडी येथील आणि प्रत्येकी सात नमुने पाषाण आणि कोथरूड येथील आहेत, अशी माहिती सहाय्यक आरोग्य अधिकारी डॉ. सूर्यकांत देवकर यांनी दिली.

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये