पुण्याच्या धायरीतील सावरकर उद्यानात प्राथमिक आरोग्य उपकेंद्र सुरू
धायरी फाट्याजवळील( गारमळा भागात )महापालिकेने स्वातंत्र्यवीर सावरकर उद्यान विकसित केले आहे. त्या उद्यानातील इमारतीत प्राथमिक आरोग्य उपकेंद्र सुरू करण्यात आले आहे. पुणे जिल्हा परिषद (आरोग्य विभाग) आणि महापालिका (आरोग्य विभाग) यांनी सुरू केलेल्या या उपक्रमाबद्दल नागरिकांमधून समाधान व्यक्त होत आहे. विशेषत: ज्येष्ठ नागरिकांसाठी तातडीने औषध उपचारांची चांगली सोय या उपकेंद्रामुळे झाल्याची प्रतिक्रिया नागरिक व्यक्त करीत आहेत. नागरिक या सेवेचा लाभ घेत आहेत अशी माहिती या उपकेंद्रातील डॉ. प्रियंका सगर यांनी दिली.
गारमळा परिसरात (मानस सोसायटीजवळ )स्वातंत्र्यवीर सावरकर उद्यान आहे. या उद्यानासाठी आमदार भीमराव तापकीर यांच्या आमदार निधीतून निधी देण्यात आला आहे. या ठिकाणी दोन-तीन खोल्यांची एक इमारत आहे. इमारतीभोवती छोटेसे मैदान आहे. महापालिकेने या ठिकाणी व्यायामाची साधनेही बसवली आहेत. त्यांचाही नागरिक मोफत लाभ घेऊ शकतात.
आता या इमारतीतच छोटेसे उपकेंद्र सुरू केल्यामुळे नागरिकांची तातडीच्या औषध उपचारांची सोय झाली आहे.
ज्येष्ठ नागरिकांना तर पूर्ण मोफत आरोग्यसेवा आणि औषधोपचारसेवा दिली जाते. सध्या वारंवार हवामान बदलामुळे अनेकांना सर्दी, खोकला, ताप, पोट बिघडणे अशा विकारांचा त्रास होत आहे. अनेकांना अस्वस्थ वाटणे अशक्तपणा वाटणे असेही विकार होतात.अशावेळी या उपकेंद्राचा खूप मोठा उपयोग नागरिकांना होत आहे. सध्या येथे ब्लड प्रेशरची तपासणी होते. लवकरच ग्लुकोमीटर (रक्तातील साखर तपासणीसाठी )चीही सोय होणार आहे अशी माहिती देण्यात आली.